कांदिवलीतून रविवारपासून बेपत्ता झालेली सात शाळकरी मुले नाशिकमध्ये सापडली आहेत. मंगळवारी या मुलांना मुंबईत आणले जाणार असून त्यानंतर त्यांची चौकशी होईल. कांदिवलीच्या बिहारी टेकडी परिसरात राहणारी ही सात मुले १५ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. ते नववी आणि दहावीतील विद्यार्थी आहेत. रविवारी सुट्टी असल्याने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फिरायला जाण्याची योजना बनवली. त्यानुसार सकाळी ११ वाजता ते एकत्रित बाहेर पडले, परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत त्यामुळे पालकांनी तक्रार केल्यांनतर समतानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या मुलांच्या चौकशीनंतरच ही मुले नाशिकला कशी गेली, त्यामागे काही कारस्थान होते का, आदी प्रश्नांची उत्तरे सापडतील.