कंगना रणौत खोटारडी आहे. खूप जास्त प्रमाणात खोटं बोललं की लक्षात रहात नाही. कंगनाचं तसंच झालंय. ती आत्ता एक बोलते आहे आणि याआधी बरंच बोलून गेली आहे. जे तिच्या लक्षात नाही असं परखड आणि थेट मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मांडलं आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं.

नेमकं काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर?
“खूप जास्त खोटं बोललं की आपण काय बोलून गेलो ते लक्षात रहात नाही. कंगनाचं तसंच झालंय. आत्ता ती जे बोलते आहे त्या वक्तव्यांच्या विरोधात ती याआधी बोलून गेली आहे. पण तिला ते आता लक्षात नाही. तिच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘मी हिमाचल प्रदेशमधून पळून आले होते.’ ‘मी ड्रग अॅडिक्ट होते.’ ही कंगनाचीच वक्तव्यं आहेत. आत्ता ती जे काही बोलते आणि वागते आहे त्याबाबत मला बोलण्याची इच्छा नाही. पण दुर्दैवाने बोलावं लागतं आहे. कारण कुठल्या व्यक्तीला किती महत्त्व द्यावं हे आपलं आपणच ठरवायचं असतं. पण त्याचवेळी ही बाबही महत्त्वाची आहे की एखादी व्यक्ती सातत्याने खोटंच पसरवत असेल. एखादी व्यक्ती एखाद्या पक्षाला, जागेला किंवा संस्कृतीला हिणवत असेल, सारखं चिथवत असेल. तर जे उत्तर देणंही गरजेचं असतं ”

मुंबई ही महाराष्ट्राची फक्त नाही. महाराष्ट्राने देशासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किती प्रश्न आहेत. ते सोडवण्याचे कष्ट कंगनाने घेतले आहेत का? मुंबईने कायमच सगळ्यांना दिलं आहे. जी वाय लेव्हलची सुरक्षा कंगनाला दिली आहे ती टॅक्स पेअरच्या पैशातूनच दिली गेली. ड्रग माफियांची नावं मुंबईत येऊन कंगना सांगणार होती. तिच्याकडे असलेली नावं तिने दिली का? कंगना इथे का आली होती? तर चिथवण्यासाठीच आली होती. कंगनाचं ऑफिस तोडलं गेली ही कारवाई चुकीची होती. ती कारवाई व्हायला नको होती असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.