मुंबई : देशद्रोहाच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने पारपत्राचे नूतनीकरण करण्यास पारपत्र प्राधिकरणाने नकार दिल्याविरोधात अभिनेत्री कंगना राणावतने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी तिच्या याचिके वर सुनावणी होणार आहे.

समाजमाध्यमावरील ट्विटद्वारे दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याच कारणास्तव भारतीय पारपत्र प्राधिकरणाने कंगनाच्या पारपत्राचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. पारपत्र प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात कंगनाने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच पारपत्राचे नूतनीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.  आपल्याला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देशात व देशाबाहेर जावे लागते. चित्रीकरणासाठी  जून ते ऑगस्ट मुंबईबाहेर जायचे आहे. पारपत्राची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे तिने पारपत्र नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. मात्र पारपत्र प्राधिकरणाने मागणी फेटाळली.