शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई मोठी राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला, तसेच या कारवाईवर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. त्यानंतर अनेकांनी कंगनाला पाठिंबा दर्शवला.

भारताची कुस्तीपटू गीता फोगाट हिनेदेखील कंगना-मुंबई महापालिका वादावर ट्विट केलं. त्या ट्विटमधून तिने कंगनाला पाठिंबा तर दर्शवलाच पण त्याचसोबत ठाकरे सरकारला पण आव्हान दिलं. “(सध्याच्या महाराष्ट्रातील घडामोडी पाहता) ज्याची सत्ता, त्याची हुकूमत चालणार असं चित्र दिसत आहे!! असो…. (तुम्ही) कंगनाचं ऑफिस तोडू शकता पण तिची हिंमत तोडू शकत नाही!!!!”, असं आव्हान तिने ठाकरे सरकारला दिलं.

दरम्यान, संजय निरूपम यांनीही या कारवाईबद्दल आपलं मत व्यक्त केलं. “सरकारमध्ये बसून आपण अशी कामं करू शकत नाही. यामुळे अतिशय चुकीचा संदेश जात आहे. ती (कंगना राणौत) भाजपच्या संपर्कात असू शकते. ती भाजपाच्या सांगण्यावरूनच हे सर्व करत असेल. परंतु एक राजकीय पक्ष आणि तोही सत्ताधारी पक्ष अशा जाळ्यात अलगद अडकत आहे हे पाहून मी शांत बसू शकत नाही. (जे घडतंय) ते चुकीचं वाटतं,” असं संजय निरूपम म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातील वृत्त दिलं.