बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईमध्ये कंगनाच्या ऑफिसचं प्रचंड नुकसान झालं असून गुरुवारी कंगनाने उद्धवस्त झालेल्या कार्यालयाची पाहाणी केली. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून याच उद्धवस्त झालेल्या कार्यालयातून काम करेन असा निर्धार तिने केला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. यामध्येच कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म या ऑफिसमध्ये बेकायदेशीर काम केल्याचं म्हणत बीएमसीने कारवाई केली. यात कंगनाच्या कार्यालयाचं नुकसान झालं असून तिने या कार्यालयाची पाहणी केली. विशेष म्हणजे कार्यालयाची झालेली दुरावस्था पाहून कंगना प्रचंड संतापल्याचं दिसून आली. यानंतर तिने ट्विटरवर तिची नाराजी व्यक्त केली आहे.

“माझं ऑफिस १५ जानेवारी रोजी सुरु होणार होतं. मात्र त्याच काळात करोनाचं संकट आलं, त्यामुळे आम्ही जे काही काम करायचं होतं ते अर्ध्यावरच थांबवलं होतं. परंतु, आता पुन्हा या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण एक सांगते, मीच याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेन. हे उद्धवस्त झालेलं ऑफिस एक प्रतिक आहे, जी स्त्री या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते तिच्यासोबत असंच होतं हे यातून सांगण्यात येतंय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केल्यानंतर कंगनाने अनेकांवर टीकास्त्र डागलं आहे. यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. इतकंच नाही तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर तिने कडाडून शाब्दिक हल्ला केल्याचं पाहायला मिळालं.