“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं आहे. यासोबतच “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज”, असंही कंगना म्हणाली आहे. राम कदम यांनी, कंगना रणौत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

“बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण, त्यासाठी तिला सुरक्षा देणं गरजेचं आहे. दुर्देवं म्हणजे १०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही”, असं ट्विट करत राम कदम यांनी कंगनाला सुरक्षेची मागणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग केलं होतं. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

“सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर त्यावर राम कदम यांनी पुन्हा रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“अभिनेत्री कंगना रणौतचं, मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते हे विधान महाराष्ट्र सरकारसाठी खणखणीत चपराक आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं” असं राम कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या तपासादरम्यान आता अंमली पदार्थ सेवनाची बाब समोर येत आहे. अशातच इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा कशाप्रकारे वापर केला जातो याचा गौप्यस्फोट कंगनाने केला आहे.