मुंबईतील पहिल्या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी
स्थानिक प्रश्न तसेच स्थानिक परंपरांची जाण ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने शनिवारी मुंबईतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींना मुंबईत बुलेट ट्रेन सुरू करायची आहे, पण उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवणार का, असा सवाल त्याने केला. ज्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकले गेले त्या पुण्यात माझ्यावरही शेणाचे गोळे फेकण्याचा इशारा दिला जात आहे, असा टोला हाणत पुण्यात जायचा निर्धार त्याने व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीला संत तुकाराम, ज्योतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांचे त्याने स्मरण केले.
नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात, आम्ही देशातील मागासलेल्या जनतेच्या आत्मसन्मानाविषयी बोलतो. आम्ही बोलतो तेव्हा त्यांना राष्ट्रवादाची आठवण होते, असे तो म्हणाला. डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे लावता, पण ब्राह्मण्यवाद आणि जातीयवादाला त्यांचा असलेला विरोध तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल त्याने केला.
वास्को द गामा बनून मोदी जगभर फिरले, पण त्यांना भारत सापडला नाही, असा टोला त्याने हाणला. सध्या दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाडय़ात ते आले नाहीत. देशभरातील २५ टक्के भाग दुष्काळात होरपळत आहे. खरे तर दुष्काळाला राष्ट्रीय महासंकट घोषित करायला हवे, अशी मागणी कन्हैया कुमार याने यावेळी केली. उजव्या विचारसरणीकडून मांडण्यात येणारा राष्ट्रवाद हा घटनाविरोधीच नव्हे तर हिंदू तत्त्वज्ञानाच्याही विरोधी आहे, असे अ‍ॅड. इरफान इंजिनिअर म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, व नाटकार जयंत पवार यांनीही देशातील सद्यपरिस्थितीवर आपले विचार मांडले.

विविध संमेलने!
येत्या ५ मे रोजी नवी दिल्ली येथे समविचारी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संमेलन भरविण्याची घोषणा यावेळी विद्यार्थी नेत्यांनी केली. त्याचबरोबर लेखक, बेरोजगार, कामगार, शेतकरी, कलाकार, छोटे व्यावसायिक, साहित्यिक आदींची राष्ट्रीय समेलने टप्प्याटप्प्याने आयोजित केली जातील, असे या वेळी जाहीर करण्यात आले. यामुळे देशभरात एक नवे आंदोलन उभे राहाण्याची चिन्हे असून दिल्लीतील ५ मे रोजीचा मेळावा ही त्याची नांदी ठरणार आहे.

चळवळीला नवचैतन्य
मुंबईमध्ये एकेकाळी सक्रीय असलेल्या पण आता मरगळलेल्या कामगार, डाव्या आणि आंबेडकरी चळवळीला कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी शेहला रशीद आणि रिचा सिंग यांच्या भाषणाने नवचैतन्य लाभल्याचे चित्र दिसत होते. कार्यक्रमाचे ठिकाण बदलूनही तुडुंब गर्दी होती. सभागृहा बाहेरील छोटय़ा पडद्यावर सुरू असलेले कन्हैयाचे भाषण ऐकण्यासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ‘जय भीम, लाल सलाम’ अशा घोषणाही घुमत होत्या.

कन्हैया कुमारला नोटीस बजावणार
पुणे : कन्हैया कुमारला आक्षेपार्ह विधान करू नये,अशी नोटीस पोलीस लोहगाव विमानतळावर त्याला बजावतील. लोहगाव विमानतळ ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंतच्या मार्गावर पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत.सभेला विरोध करणाऱ्या पाच ते सहा संघटनेच्या कार्यकर्त्यांंना सीआरपीसी १४४ नुसार नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, कन्हैयाकुमार याची सभा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून तो फर्गसन महाविद्यालय आणि एफटीआय येथे भेट देणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.