कांजूरमार्ग कचराभूमी प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाची हतबलता

मुलुंड येथील कचराभूमी बंद करण्यात आली असून देवनार येथील कचराभूमी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केवळ कांजूरमार्ग येथील कचराभूमीच उपलब्ध आहे. परिणामी या कचराभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावताना घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांची पालिकेतर्फे अंमलबजावणी केली जात नसतानाही काहीच कारवाई करता येत नाही. अन्यथा मुंबईकरांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी हतबलता राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली.

त्यावर नियमांना हरताळ फासणाऱ्या पालिकेला न्यायालयाने फटकारले व कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा प्रकल्प किती दिवसांत पूर्ण करणार हे सांगून तशी हमीही मागितली आहे.

कांजूरमार्ग कचराभूमीच्या भोवताली निवासी परिसर आहे. परंतु येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेतर्फे आवश्यक त्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केला जात नाही. त्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला असून लोकांना तेथे राहणे कठीण झाले आहे. प्रदूषण मंडळातर्फेही पालिकेवर काहीच कारवाई केली जात नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

पालिकेने आपली भूमिका बदलली नाही, तर मुंबईत भयावह स्थिती निर्माण होईल. त्यामुळे कांजूरमार्ग येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीचा शास्त्रोक्त प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण करणार, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.