महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांत आपल्या विधानांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बेळगावमधील कार्यक्रमात कर्नाटकाचे गौरव गीत गायल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका करत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर स्थानिकांशी सुसंवाद साधण्यासाठी दुर्गादेवीवर दोन मिनिटे कन्नडमधून भाषण केले व गाण्याच्या दोन ओळी गायलो. त्यात कसलाही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमधील तवग गावातील दुर्गादेवी मंदिर उद्घाटन कार्यक्रमात कन्नड अभिनेता राजकुमार याच्या ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ या गाण्याचे बोल आळवले. या गाण्याचा अर्थ जन्म घ्यावा तर कर्नाटकात असा होत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सीमाभागातील मराठी संघटना, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सोमवारी सायंकाळी मंत्रालयासमोरील चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकात मराठी भाषकांना वाईट वागणूक मिळते. हे माहिती असतानाही पाटील यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणे अयोग्य आहे. त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तर चंद्रकांत पाटील यांना कर्नाटक भूमीतच जन्म घ्यावा वाटतो हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात जन्म घेतल्याची खंत बाळगणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.

भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीने उगाच कशावरूनही राजकारण करू नये, असे उत्तर दिले आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यात गावकऱ्यांनी कन्नड भाषेतून संवाद साधण्याची आणि गीत गाण्याची विनंती केली. त्यानुसार स्थानिकांशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने दुर्गादेवीवर दोन मिनिटे कन्नडमधून भाषण केले व गाण्याच्या दोन ओळी गायलो. त्यानंतर वीस मिनिटे ग्रामविकास या विषयावर हिंदीतून भाषण केले. तेथील वातावरणात सहज हा प्रकार घडला. त्यात कसलाही राजकीय हेतू नव्हता.

– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री