भारतातील तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत नेहमी पक्षपाती भूमिका घेतात, अशी टीका ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भरप्पा यांनी शुक्रवारी दादर येथे केली.
विवेक व्यासपीठ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, अ‍ॅड फ्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उमा कुलकर्णी व रतन राजदा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
विशिष्ट समूहाच्या बाबतीत एखाद्या घटनेत किंवा प्रसंगात ही मंडळी घसा खरवडून जाहीरपणे बोलतात तर कधी मूग गिळून गप्प बसतात, असा सडेतोड टोला लगावत भरप्पा म्हणाले, ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वेळोवेळी सोईस्कर भूमिका घेतात. सलमान रश्दीचे पुस्तक असो किंवा एम. एफ. हुसेन यांची वादग्रस्त चित्रे असोत. या व अन्य घटनांमध्ये या मंडळींची आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांची भूमिका नेहमीच सोईची व पक्षपाती राहिली असल्याचेही भरप्पा यांनी सांगितले.
साहित्य, नृत्य, संगीत व अन्य कोणत्याही कला आणि मानवी जीवनमूल्ये यांचा निकटचा संबंध आहे. लेखकाने तर आपल्या लेखनातून सातत्याने मानवी जीवनमूल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. साहित्यातून मानवी जीवनमूल्यांचे प्रतििबब उमटले पाहिजे, असे आवाहनही भरप्पा यांनी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक रवींद्र साठे यांनी प्रास्ताविक तर अश्विनी मयेकर यांनी सूत्रसंचालन केले.