शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी करीम लाला याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जात असत असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला असताना करीम लाला याच्या नातवाने त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. आपल्या कार्यालयात इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची भेट झाल्याचा फोटो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील करीम लाला याची भेट घ्यायचे असा दावा केला आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सलीम पठाण यांनी इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्यामधील भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी इतर राजकीय नेत्यांचे फोटोही शेअर केले आहेत. संजय राऊत यांनी इंदिरा गांधींसंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर  सलीम पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हा फोटो करीम लाला याच्या नातवाने शेअर केला आहे

“मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार ? तसंच मंत्रालयात कोण बसणार ? हे अंडरवर्ल्ड ठरवत असे. जेव्हा हाजी मस्तान मंत्रालयात येत असे तेव्हा अख्खं मंत्रालय खाली येत असे. इंदिरा गांधीही पायधुनी येथे करीम लालाला भेटण्यासाठी आल्या होत्या,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली होती. अशी वक्तव्यं यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपण निषेध सुरु झाल्यानंतर संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. आपल्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदरच आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना इंदिराजी समजल्याच नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. राऊत यांच्या फटकेबाजीमुळे शिवसेनेची मात्र पंचाईत झाली आहे.

संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
करीम लाला हा एके काळी पठाणांचा नेता होता. त्या नात्याने इंदिराजी त्याला भेटल्या होत्या. त्यात विशेष काही नाही. इंदिराजींना समजून घेणे अवघड आहे. त्या कोणाला समजल्या नाहीत, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते मी मागे घेतो, असे राऊत म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेमुळे किंवा काँग्रेसच्या दबावामुळे वक्तव्य मागे घेतले का, असे विचारता माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी स्वत:हून ते मागे घेतले असल्याचे राऊत यांनी सांगितले.