पोलिसांचा तपास अद्याप अधांतरी

सुमननगरमध्ये राहणाऱ्या करिश्मा माने या तरुणीच्या हत्येला २४ तास उलटूनही हल्लेखोराला मुंबई पोलिसांना पकडता आलेले नाही. नेहरूनगर पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. करिश्माच्या मित्राची नेहरूनगर पोलीस चौकशी करत असून, त्यातून करिश्माला कोणी त्रास देत होते का, कुणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता का, याविषयी धागेदोरे मिळतायत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. करिश्माच्या अंगावरील दागिने चोरीला न गेल्याने चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नसून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा किंवा तिच्याशी भांडण झालेल्या व्यक्तीने हल्ला करून केवळ तिला घाबरविण्यासाठी एक वार करून हल्लेखोराने पळ काढला असावा, असा अंदाज आहे.

२४ वर्षीय करिश्मा माने मंगळवारी सकाळी कामावर जाण्यास निघाली असताना सुमननगरच्या अण्णा भाऊ साठे उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या पायवाटेवर असताना अज्ञात व्यक्तीने पाठीत सुरा खुपसून पळ काढला. अतिरक्तस्रावामुळे करिश्माचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) शहाजी उमप यांनी पोलिसांच्या सात पथकांची निर्मिती केली असून परिसरातील रहिवासी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. करिश्माचा शाळेपासून असलेल्या मित्राचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

सीसीटीव्ही बंद?

ज्या ठिकाणी करिश्मावर हल्ला झाला, त्या रस्त्यावर सीसीटीव्ही नसल्याने हल्लेखोराचे छायाचित्र मिळणे कठीण झाले आहे. तसेच नजीकच्या भागात लावलेले सीसीटीव्ही वीज गेल्याने बंद असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हल्लेखोराचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.