बहुमत नसल्यामुळे तीन दिवसातच कर्नाटकातील भाजपा सरकार कोसळले असून बी.एस.येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कर्नाटकातल्या या राजकीय घडामोडींबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले कि, जवळ आवश्यक बहुमताचा आकडा नसताही भाजपाने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवायला नको होतं. बहुमत नसतानाही येडियुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय म्हणजे संसदीय लोकशाहीवर आघात आहे असे ते म्हणाले.

कर्नाटकाच्या राज्यापालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही. त्यांनी लोकशाहीवर उलटा आघातच केला त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली तसेच काँग्रेस-जेडीएसचे आमदार कुठल्याही आमिषाला न भुलता पक्षाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेत त्याबद्दल त्यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे अभिनंदन केलं. मागच्या तीन दिवसात कर्नाटकात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या.

पण येडियुरप्पा यांना तीनच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ते काहीसे भावूक झाले होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. भाजपाच्या हातात फक्त २४ तासांचा अवधी होता. १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तेस्थापनेसाठी आवश्यक असलेले १११ चे संख्याबळ त्यांच्याकडे नव्हते. दुसरीकडे काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षाने निवडणुकोत्तर युती केल्याने त्यांचे संख्याबळ ११५ वर पोहोचले होते.