News Flash

कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे शिवसेना खूश

कर्नाटकात भाजपचे गर्वहरण झाले आहे

( प्रतिकात्मक छायाचित्र )

कर्नाटकात स्पष्ट बहुमताच्या संख्येपासून दूर असताना सरकार स्थापन केल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच राजीनामा देण्याची वेळ भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर आल्याने भाजपच्या या पराभवामुळे महाराष्ट्रात भाजपसह सत्तेत भागीदार असणारी पण सातत्याने विरोधी सूर लावणारी शिवसेना खूश झाली आहे. भाजपचे गर्वहरण झाल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.

शिवसेना महाराष्ट्रात भाजपसह सत्तेत सहभागी असली तरी वेळोवेळी विविध धोरणांवरून, निर्णयांवरून भाजपला विरोध करत आहे. काही महिन्यांपूर्वी तर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाच शिवसेनेने केली. त्याचबरोबर कर्नाटकात गेल्या दोन दिवसांत सुरू असलेल्या घडामोडींवरही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतून आनंदाचे सूर उमटले. हुकूमशाही व मनमानीच्या अंताची ही सुरुवात आहे. कर्नाटकात जे घडले, ते लोकशाहीविरोधी होते. आपण कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकू शकतो व सत्ता आणू शकतो या विकृतीचा हा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.

तर कर्नाटकात भाजपचे गर्वहरण झाले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या निर्णयप्रक्रियेतील संदिग्धतेचा गैरफायदा घेण्याच्या प्रकाराला यानिमित्ताने आळा बसला आहे. पण कर्नाटकातील या घटनेच्या पाश्र्वभूमीवर त्रिशंकू विधानसभा असताना राज्यपालांनी कशा प्रकारे निर्णय घ्यावे यावर देशव्यापी विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. अन्यथा असेच प्रकार पूर्वीही होत होते व यापुढेही सुरूच राहतील, असे गोऱ्हे यांनी नमूद केले. आज कर्नाटक जात्यात होते उद्या महाराष्ट्र सुपात असू शकतो, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

भाजप मुख्यालय ओस

कर्नाटकात येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही हे समजल्याने भाजपच्या गोटय़ात कमालीची शांतता होती. भाजपचे मुख्यालय ओस पडलेले होते. दोन-चार पत्रकारांशिवाय कोणीही नव्हते. दुपारी चारच्या सुमारास भाजपचा पराभव झाल्याची खात्री पटताच काँग्रेस मुख्यालयात मात्र जल्लोषाचे वातावरण होते. गेल्या आठवडय़ात भाजप कार्यालयात सकाळच्या वेळी जो उत्साह पाहायला मिळत होता त्याची पुनरावृत्ती काँग्रेस मुख्यालयात पाहायला मिळाली.

सगळे विरोधक मिळून भाजपचा पराभव करू

कर्नाटकात जनतेच्या हिताचे रक्षण काँग्रेस आणि जनता दल आघाडीने केले. तसेच आम्ही प्रत्येक राज्यात करू. विरोधकांच्या एकत्रित समन्वयातून भाजप आम्ही पराभव करू, असा आत्मविश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:22 am

Web Title: karnataka legislative assembly election 2018 10
Next Stories
1 ..तर ठेकेदारांना बुलडोझरखाली टाकू – गडकरी
2 ‘सर्वोच्च न्यायालयातील प्रश्नांवर बाहेरून मदत घेणे चूकच’
3 पाकिस्तानात ‘डॉन’ वृत्तपत्राचे वितरण रोखले
Just Now!
X