‘जय महाराष्ट्र’प्रकरणी कारवाईचा इशारा देणाऱ्यांची पाश्र्वभूमीच वादग्रस्त

सीमाभागातील लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करण्याचे सूतोवाच करणारे कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांची पाश्र्वभूमी वादग्रस्त आहे. कुख्यात तेलगी घोटाळ्यात नाव आल्याने मागे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच तेलगी घोटाळ्यात बेग यांच्या भावाला अटक झाली होती. यामुळेच बेग यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधही केला होता, पण पुढे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांचाही नाइलाज झाला होता.

बेळगावसह सीमाभागातील पालिकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य निवडून येतात. बेळगावमध्ये तर मराठी भाषकांची सत्ता आहे. बेळगावमध्ये मराठी भाषकांवर अन्याय करण्याचे कर्नाटक सरकारचे कायम धोरण असते. कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी तर ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास सदस्यत्व रद्द करण्याबाबत कायदा करण्याचे सूतोवाच केले. त्यावरून मराठी भाषकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेनेने लगेचच आंदोलन सुरू केले. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात गुरुवारी मराठी भाषकांचा मोर्चा निघणार असतानाच, रोशन बेग यांनी वादाला नव्याने फोडणी दिली.

रोशन बेग कोण?

कर्नाटकची राजधानी बंगळूरु शहरातून विधानसभेवर निवडून येणारे रोशन बेग यांची पाश्र्वभूमी वादग्रस्त आहे. देशभर गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात रोशन बेग यांचे नाव आले होते. कर्नाटक विशेष चौकशी पथकाने रोशन बेग यांचे बंधू रेहान बेग यांना बनावट मुद्रांकप्रकरणी गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात अटक केली होती. भावाच्या अटकेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळातून रोशन बेग यांना राजीनामा द्यावा लागला होता. अब्दुल करीम तेलगी आणि रोशन बेग यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते, अशीही तेव्हा चर्चा होती. तेलगी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र विशेष चौकशी पथकाने आंध्र प्रदेशमधील तेलगू देसमचा आमदार चेन्ना बोयन्ना कृष्णा यादव आणि तेलगीचा वकील अब्दुल रशीद कुलकर्णी यांना बंगळूरुमधून अटक केली होती. पण रोशन बेग किंवा त्याच्या भावाला राज्य विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतले नव्हते, अशीही तेव्हा चर्चा झाली होती.

जून २००२ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारच्या विरोधात तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची फोडाफोडी टाळण्याच्या उद्देशाने या आमदारांना बंगळूरु शहराच्या जवळील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा या आमदारांची सरबराईचे काम रोशन बेग यांनी केले होते. आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलचा खर्च आणि खासगी विमानाचा सारा खर्च रोशन बेग याने तेलगीकडून वसूल केला होता, असा आरोपही तेव्हा झाला होता. मे २०१३ मध्ये कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत आला तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रोशन बेग आणि डी. शिवकुमार या दोन वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे टाळले होते. रोशन बेग यांच्या विरोधात तेलगी घोटाळ्याचा आरोप असल्यानेच सिद्धरामय्या यांनी बेग यांचा समावेश टाळला होता. बेग यांच्या समावेशास तेव्हा राहुल गांधी यांनीही फुल्ली मारली होती. पण पुढे काँग्रेस नेतृत्वाने रोशन बेग यांच्या मंत्रिमंडळात समावेशास हिरवा कंदील दाखविला. याच बेग यांनी मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

  • कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीविरोधात मराठी भाषक गुरुवारी भव्य मोर्चा काढणार आहेत.