कर्नाटकाचे मुंबईतील बंडखोर आमदार आता बंगळरूला रवाना झाले आहेत. काहीवेळापूर्वीच ते मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभा अध्यक्षांची सायंकाळी सहा वाजता भेट घेऊन, आपल्या आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या आमदारांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, या आमदारांना सुरक्षा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कर्नाटक पोलिसांना दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

तर, आमचे राजीनामे मंजूर करण्यास विधानसभा अध्यक्ष नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचा आदेश द्यावा, असे या आमदारांनी म्हटले आहे. आम्ही स्वइच्छेने राजीनामे दिले असल्याने, आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्याच्या उल्लंघनाचा प्रश्नच येत नाही, असे या बंडखोर आमदारांनी सांगितले आहे. शिवाय आम्हाला अपात्र घोषित करण्यासाठी काँग्रेसने केलेला अर्ज निरर्थक असल्याने विधानसभा अध्यक्षांना त्यावर सुनावणी घेण्यास मनाई करावी, अशी मागणी देखील आमदारांकडून करण्यात आली आहे.

तर या अगोदर कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र याप्रकरणी आज सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दर्शवला. तसेच, न्यायालयाने सांगितले की, आम्ही सकाळीच या प्रकरणीची सुनावणी करण्यास उद्याचा दिवस ठरवला आहे.

तर काँग्रेस नेते व वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा न्यायालयात उल्लेख करत म्हटले की, न्यायालय विधानसभा अध्यक्षांना दहा बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देऊ शकत नाही.