कार्तिकी वारीसाठी राज्यासह कर्नाटकातून जवळपास ४ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. शहरातील मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी जवळपास १० ते ११ तास लागत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीची एकादशी निमित्त शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.

वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीला देव म्हणजे परमात्मा पांडुरंग झोपी जातो. पुढे हाच देव कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागा होतो. त्यामुळे जसे आषाढी एकादशीला महत्त्व आहे तसे कार्तिकी एकादशीला देखील आहे. या वारीसाठी राज्यातून मुंबई,कोकण,नांदेड,परभणी,तसेच विदर्भातील भाविक दरवर्षी येतात. तसेच कर्नाटकातून देखील या वारीला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर दशमीला म्हणजेच गुरुवारी जवळपास ४ लाख भाविक दाखल झाले आहेत.

पंढरीतील मंदिर परिसर तसेच विविध मठांमध्ये भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठय़ा प्रमाणत दाखल झाले आहेत. या ठिकाणी पालिकेने पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा, वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत. तर चंद्रभागा नदीपात्रात पाणी वाढल्याने यंदा राज्य आपत्ती यंत्रणा तसेच अकोला येथील स्वयंसेवी संथा तसेच स्थानिक कोळी बांधवांची मदत प्रशासनाने घेतली आहे.शहरात स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणा राबवली आहे. तसेच प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. शहरात रोगराईचा प्रादुर्भाव होऊ  नये म्हणून विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे.

शहरातील ४ प्रमुख ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस ही संकल्पना राबविण्यात आली आहे. एखाद्या भाविकाला मदत लागली तर या माध्यमातून ती दिली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली आहे. याही वर्षी मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा,पिण्याचे पाणी,फराळ तसेच वैद्यकीय सेवा पुरवली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी पदस्पर्श दर्शन रांग पत्रा शेड येथे पोहचली होती. साधारणपणे १० ते ११ तास दर्शनाला लागत आहेत . आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारी उशिरा ते पंढरीत दाखल झाले. विठुरायाची नगरी भाविकांनी फुलून गेली आहे.