समाजमाध्यमांवर संतापाची लाट; कलाकारांचे कार्यक्रमही रद्द 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे सर्व क्षेत्रात तीव्र उमटले असून एकीकडे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली, तर समाजमाध्यमांवरही या हल्ल्याबाबत संताप व्यक्त होत आहे. कलाकारांनीही या हल्ल्याचा निषेध करताना आपले नियोजित कार्यक्रम रद्द के ले आहेत.

गुरुवार रात्रीपासूनच समाजमाध्यमांवर या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. हल्ल्याच्या निषेध करणाऱ्या, श्रद्धांजली अपर्ण करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकल्या जात होत्या. त्यातून पाकिस्तानला धडा शिकवा, असा सूर उमटत होता. अनेकांनी आपला व्हॉट्सअ‍ॅपवरचा डीपी बदलून त्या जागी शहीद जवानांना श्रद्धांजली देणारे छायाचित्र, १४ फेब्रुवारी काळा दिन अशा संदेशाचे डीपी ठेवले होते. अनेकांनी ग्रुपमध्ये विनोद, फॉरवर्डस पाठवायचे नाहीत, असे जाहीर करून वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली.

मुंबई विद्यापीठातर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. विद्यानगरी आणि फोर्ट परिसरात श्रद्धांजली कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख आणि संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भेंडी बाजार बंद

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजार या मुस्लिम बहुल भागातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला होता. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी ध्वजही जाळले.

ठाणे, घाटकोपरमध्येही निषेध

ठाण्यातील राबोडी भागातील मुस्लीम समाजातर्फे हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकांनी मौलवींसह रस्त्यावर उतरत निषेध केला. तर यंग व्हॉइस क्लबच्या तरुणांनी घाटकोपर पूर्व स्थानकाजवळ पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

‘चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल’ तसेच क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स यांनी ३८वा वार्षिक महोत्सव दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून रद्द केला.

अभिनेत्री कंगना राणावत हिने ‘मणिकर्णिका’चे यश साजरे करण्याचे ठरवले होते. यासाठी तिने मेजवानी शनिवारी आयोजित केली होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर कंगनाने ही मेजवानी रद्द केली आहे.

कलावंतांकडून तीव्र निषेध

कराची आर्ट कॉन्सिलकडून ज्येष्ठ  गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचे आमंत्रण देण्यात आले होते. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारले होते. यासाठी दोन दिवसांचा कराची दौराही दोघे करणार होते. मात्र त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीने समाजमाध्यमावर कविता पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही.. अशा शब्दांत जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, उरी द सर्जिकल स्ट्राइक फेम विकी कौशल, अजय देवगण, अभिषेक बच्चन, मनोज वाजपेयी, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करण जोहर, अर्जुन कपूर, आर. माधवन, वरुन धवन, ऋषी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, अनुपम खेर, आयुष्यमान खुराना,  विनोदी अभिनेते जॉनी लिवर, परेश रावल, गीतकार लेखक प्रसून जोशी, प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी जवानांप्रती आपल्या सहृदय भावना व्यक्त करत त्यांना समाजमाध्यमावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

दहनासाठी पाकिस्तानच्या १०० झेंडय़ांची विक्री

पुणे : येथील मुरुडकर झेंडेवाले या प्रसिद्ध झेंडेविक्रेत्याने शुक्रवारी पाकिस्तानच्या तब्बल १०० झेंडय़ांची विक्री केली. प्रत्येक झेंडय़ाबरोबर त्यांनी एक लायटर मोफत दिला होता. पुलवामा हल्ल्याच्या निषेधात पुणे आणि परिसरात हे झेंडे जाळले गेले.