राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काश्मीरचा मुद्दा घेवून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोक करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.दरम्यान या निवडणुकीत निश्चितरुपाने सत्तापरिवर्तन होणार असा तरुण, शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून असे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मांडलेल्या या मुद्यावर नवाब मलिक यांनी टीका केली. तसेच, काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, यामध्ये कुणाचे दुमत नाही. परंतु, यावरून काही दिवसांपासून भाजपचे लोक जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काश्मीर भारताला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले होते. जर काश्मीर आता भारताला मिळाला आहे, तर काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबतचे सरकार कुठल्या देशात चालवले जात होते? याचं उत्तर भाजपच्या लोकांनी द्यायला हवे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, जम्मू-काश्मीरमध्ये ७० दिवसांत एकही गोळी चालली नाही. काश्मीर शांत राहिला पाहिजे हे देशवासियांना वाटत आहे. परंतु ७० दिवस झाले तरी येथील कर्फ्यू का काढत नाही, याचंही उत्तर अमित शाह यांनी द्यायला हवं, असा टोला देखील मलिक यांनी लगावला आहे.

राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त भागात मदत देता आलेली नाही, शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी देता आली नाही, महाराष्ट्रात मंदीमुळे कारखानदारी बंद पडत आहे, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे असे सांगत महाराष्ट्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याचे मलिक यांना सांगितले आहे.