पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा करत एक काश्मिरी तरुण शुक्रवारी मुंबई पोलिसांपुढे हजर झाला. आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
 शुक्रवारी सकाळी बशीर अहमद गोलू (२५) हा तरुण मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा क्रमांक एकमध्ये गेला. मी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा सदस्य असून पुण्यात तीन साथीदारांच्या मदतीने स्फोट केल्याचा दावा त्याने केला. मुंबईत येत्या २० जुलै रोजी पंचतारांकित हॉटेलात बॉम्बस्फोट घडविणार असल्याचेही त्याने सांगितले. यावेळी त्याने आपल्या तीन साथीदारांचीही नावे सांगितली.
आझाद मैदान पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याला अटक केली असून  २२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने मस्करी पोटी किंवा दिशाभूल करण्यासाठी असा दावा केला असला तरी आम्ही त्याची सत्यता पडताळून पहात आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
तो काश्मिरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील आहे. तो सतत आपला जबाब बदलत आहे. पोलिसांचा खबरी बनल्यास पैसे मिळतील या हेतूनहेही तो पोलिसांकडे आला असावा अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.