मुंबई : ‘‘काश्मीरमधील खरी स्थिती जनतेसमोर आणण्यापासून स्थानिक पत्रकारांना मज्जाव केला जात आहे. लोक जाहीरपणे काहीही बोलायला घाबरत आहेत. शिवाय जबाबदार सरकारी अधिकारीसुद्धा बोलण्यास नकार देत असल्याने उपलब्ध माहितीची खातरजमा करून घेणे पत्रकारांसाठी कठीण बनले आहे,’’ असा आरोप ‘काश्मीर टाइम्स’च्या अनुराधा भसिन यांनी केला आहे.

‘‘ वृत्तपत्रांमध्ये छापून येणारे नियमित सदर आणि अग्रलेख गायब झाले आहेत. त्याऐवजी जीवनशैली आणि आरोग्यविषयक असे अनावश्यक लेख छापून येत आहेत’’, असे त्यांनी सांगितले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पत्रकारांची आणि एकूणच काश्मीर खोऱ्याची स्थिती काय आहे हे देशासमोर यावे यासाठी भसिन यांनी मुंबईत हजेरी लावली. इंडियन एक्स्प्रेसच्या संपादिका निरुपमा सुब्रमण्यम् यांनी त्यांच्याशी संवाद साधला. काश्मिरी जनता एकमेकांना जगण्यासाठी सहकार्य करत असल्याचेही भसिन यांनी सांगितले. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅडव्होकेट आस्पी चिनॉयही उपस्थित होते. ‘‘संपर्काची साधने बंद करणे म्हणजे प्रसारमाध्यमांना विसाव्या शतकात ढकलण्यासारखे आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे,’’ असे चिनॉय म्हणाले.