शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मला कस्तुरबामध्ये करोना संसर्गाच्या वार्डमध्ये उद्यापासून जायचे, असे सांगितले तेव्हा मला हे जमेल का असा प्रश्न पहिल्यांदा मनात आला. परंतु भीती अजिबात वाटली नाही. आम्ही त्यांची काळजी घेतली नाही, तर मग कोण घेणार?  असा प्रश्न जेव्हा परिचारिका सुनंदाताई (नाव बदलले आहे) विचारतात, तेव्हा इमारतीमधील आपल्या शेजारच्या रुग्णांना, डॉक्टरांना वाळीत टाकणारे लोक याच समाजातले आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

दादरला राहणाऱ्या सुनंदाताई गेली दहा वर्षे प्रसूतिगृहात काम करत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य रुग्णांची सेवा करण्याचे काम आपल्याला येईल ना ही चिंता त्यांना पहिल्या दिवशी लागली होती. परंतु दिवसभरात सर्व कामे समजून घेतल्यावर आता त्या आत्मविश्वासाने स्वत: रुग्णांची काळजी घेत आहेत.

वार्डमध्ये जाताना आणि आल्यावरही आम्ही नीट काळजी घेतो. प्रत्येक वेळेस आत जाताना संपूर्ण शरीर झाकणारा हजमत सूट घालतो आणि बाहेर आल्यावर काढून टाकतो. रुग्णांनाही नीट काळजी घेण्यासाठी   समजावतो. काही वेळेस रुग्ण मास्क लावत नाहीत. ते लावणे का गरजेचे  आहे, हे त्यांना समजावतो. रुग्णालयातून घरी जाण्यापूर्वी आंघोळ करतो. घरी गेल्यावरही कशालाही स्पर्श करण्यापूर्वी आंघोळ करतो आणि कपडेही गरम पाण्यात घालून धुऊन टाकतो. त्यामुळे संसर्ग घरामध्ये मुलांना होईल का याची धाकधूक मनात नसते, असे याच रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका सांगतात.

रुग्ण मात्र अनेकदा अस्वस्थ असतात. वार्डमध्ये गेल्यावर आमची चाचणी निगेटिव्ह आली का, आम्ही बरे होणार ना, असे प्रश्न वारंवार विचारत असतात. त्यांच्या समोर असलेल्या टीव्हीत सतत दिसणाऱ्या बातम्यांमुळे त्यांची अस्वस्थता अजूनच वाढत असते. तुम्ही नक्की बरे होणार आणि लवकर घरी जाणार असे बोलून आम्ही त्यांना धीर देत असतो, असे सांगताना या परिचारिकांच्या आवाजात खंबीरपणा आणि धीटपणे काम करण्याची मनाची तयारी असल्याचे नक्कीच दिसून येते.

घरातल्यांचा खंबीर पाठिंबा

आमच्या इमारतीत आम्ही आठ जणी सध्या कस्तुरबामध्ये काम करत आहोत. प्रत्येकीच्या कुटुंबाला आम्ही काय काम करतो याची जाणीव आहे. त्यांचा खंबीर पाठिंबाही आम्हाला आहे. माझी लहान मुलेसुद्धा मम्मी तू कामावर जा, असचं सांगतात, त्यामुळे उलट अजून हुरूप येतो, असे सुनंदाताई सांगतात.