नमिता धुरी

पदपथावर फेरीवाले बसविण्यास विरोध; मंडईत जागा देण्याची मागणी

बोरिवलीच्या कस्तुरपार्क परिसरातील पदपथांवर तब्बल ३१९ फेरीवाल्यांना व्यवसायाची परवानगी देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयविरोधात येथील रहिवासी एकवटले आहेत. फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता, गर्दी वाढून परिसर बकाल होण्याची भीती त्यांना आहे. साधारण दीड हजार रहिवाशांनी स्वाक्षरी करत ‘कस्तुरपार्क वाचवा’ मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत सर्वत्र फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यावरून रहिवाशांचे पालिका अधिकाऱ्यांशी खटके उडत आहेत. बोरिवली पश्चिमेच्या कस्तुरपार्क परिसरात सध्या ६० फेरीवाले आहेत. नव्या धोरणानुसार तिथे एकूण ३१९ फेरीवाल्यांना परवानगी देण्यात येणार आहे. स्थानिकांशी सल्लामसलत न करता पालिकेने परस्पर निर्णय घेतल्याने रहिवासी नाराज आहेत.

कस्तुरपार्कच्या रिलायन्स मॉलपासून चिंतामणी उद्यानापर्यंतचा रस्ता फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे या परिसरात सध्या बसणाऱ्या ६० फेरीवाल्यांना पदपथांवरच अधिकृत जागा दिली जाईल. शिवाय २५९ नवीन फेरीवालेही बसवले जातील. ‘फेरीवाल्यांमुळे ग्राहकांची, त्यांच्या गाडय़ांची गर्दी वाढेल, पदपथांवरून चालणे कठीण होईल. अपघात वाढतील. ध्वनिप्रदूषण, कचरा आणि दरुगधी वाढेल. फेरीवाल्यांसाठी शौचालयांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडेल,’ अशी भीती ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क’चे सचिव आणि या परिसरातील रहिवासी सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केली.

या मंडळाने राबवलेल्या ‘कस्तुरपार्क वाचवा’ या स्वाक्षरी मोहिमेला सुमारे दीड हजार रहिवाशांनी पाठिंबा दर्शवला. शिवाय १२० सोसायटय़ांनी फेरीवाला क्षेत्राला विरोध करणारे पत्र पालिकेला लिहिले आहे. १९९८ साली अशाचप्रकारे फेरीवाला क्षेत्र उभारण्याची कल्पना पुढे आली होती. तेव्हाही रहिवाशांनी विरोध केला होता.

कस्तुरपार्कमधील पालिकेच्या बाजारातील कित्येक गाळे रिकामे आहेत. तिथे फेरीवाल्यांना जागा द्यावी, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र त्या बाजारात फेरीवाल्यांना वीज देयके भरावी लागतात. शिवाय त्यांना आरोळ्या ठोकत धंदा करायचा असतो. त्यामुळे त्यांना पदपथांवर जागा देत असल्याची माहिती आर मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

आपल्या दारात फेरीवाले नको असे प्रत्येकाला वाटते. मात्र लोकसंख्येच्या अडीच टक्के फेरीवाल्यांना जागा द्यावी, असा न्यायालयाचा आदेश आहे. कस्तुरपार्कचे पदपथ ६ फुटांचे आहेत. ३ फूट जागेत फेरीवाले बसतील. १ मीटर बाय १ मीटरची जागा त्यांना दिली जाईल. दोन जागांमध्ये १ मीटर अंतर असेल. दिलेल्या जागेबाहेर आल्यास कारवाई केली जाईल.

– रमाकांत बिरादार, साहाय्यक आयुक्त, आर मध्य विभाग