वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने राज्याच्या विविध भागात पुस्तक प्रदर्शन भरवून फक्त ५० रूपयांमध्ये पुस्तक विक्री करणाऱ्या अजब डिस्ट्रिब्युटर्स आणि आयडियल बुक व्यवस्थापनाला कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने ‘एलबीटी’ वसुलीसाठी गेल्या काही दिवसापासून हैराण केले आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर ही पुस्तके विकण्यात येत आहेत.
पुस्तकांना कोठेही एलबीटी नाही असे पालिका कर्मचाऱ्यांना सांगूनही ते ऐकत नाहीत. याउलट नोटीस पाठवून आम्हाला त्रस्त करण्यात येत असल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. मार्च अखेर आल्याने ‘एलबीटी’वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वसुली रकमेचे इष्टांक देण्यात आले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी कर्मचारी वाट्टेल त्या थराला जात आहेत. पालिका हद्दीतील सुमारे पंधरा हजार एलबीटीची नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी सुमारे सहा ते सात हजार व्यापारी एलबीटीचा पालिकेकडे भरणाच करीत नसल्याची पालिकेतील सुत्रांची माहिती आहे. अशा व्यापाऱ्यांकडून दंडात्मक, फौजदारी कारवाई करून एलबीटी वसुली करण्याऐवजी पालिकेचे कर्मचारी पुस्तक विक्रेत्यांना हैराण करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एलबीटी विभागाच्या निष्क्रियतेमुळे यावर्षी इष्टांक पूर्ण होणे अवघड झाले आहे. त्यातून सामान्य ग्राहकाला त्रस्त करण्याचे उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या महिन्यापासून रामनगरमधील बोडस सभागृहात ‘अजब व आयडीयल’चे ५० रूपयांत कोणतेही पुस्तक विकत घेण्यासाठी प्रदर्शन सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागात प्रदर्शन भरविले तेथे कोठेही आमच्याकडून जकात किंवा एलबीटी वसुली करण्यात आली नाही.
भारतातील कोणत्याही प्रकाशनावर अशाप्रकारे कर वसुली केली जात नाही असे पालिका कर्मचाऱ्यांना सांगुनही ते गेले काही दिवस आम्हाला दोन टक्के एलबीटी भरा, दंडात्मक कारवाई करू असे सांगत आहेत. आता कर भरण्याची नोटिस आम्हाला बजावण्यात आली आहे, असे शीतल मेहता यांनी सांगितले.
पालिका कर्मचारी सावंत यांनी सांगितले, शाळेची व धार्मिक, वाड:मयीन पुस्तकांवर कोणताही कर आकारला जात नाही. त्याच्या व्यतिरिक्तच्या पुस्तकांवर दोन टक्के एलबीटी आकारला जातो. पुस्तक प्रदर्शन आयोजकांकडून का एलबीटी वसुली केली जाते याची माहिती भालेराव साहेब यांच्याकडून घ्या असे कर्मचाऱ्याने सांगितले.