कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचना विभागातील निलंबित साहाय्यक संचालक नगररचनाकार सुनील जोशी यांना पालिका प्रशासनाने सोमवारी सेवेत हजर करून घेण्याचे आदेश दिले. लाच घेताना पकडल्याने मागील साडेचार वर्षांपासून जोशी पालिका सेवेतून निलंबित होते.
कल्याण स्पोर्टस क्लबचे संचालक डॉ. दिलीप गुडखा यांच्याकडून पाच लाखाची लाच घेताना २२ फेब्रुवारी २०१० रोजी जोशी यांना यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रशासनाने सेवेतून निलंबित केले होते. मागील साडेचार वर्षांच्या काळात निलंबित असताना प्रशासन जोशी यांना पूर्ण पगार देत होते. आतापर्यंत त्यांना सुमारे साड नऊ लाखापर्यंत रक्कम प्रशासनाने अदा केली आहे. माजी महापौर वैजयंती गुजर यांच्या कार्यकाळात जोशी यांना सेवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. महासभा सुरू होण्यापूर्वी मनसेच्या नगरसेवकांनी अचानक जोशी यांना सेवेत घेण्यास विरोध केल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजप अडचणीत आली होती. त्यानंतर जोशी यांना सेवेत घेण्याचा विषय बारगळला होता. दोन महिन्यापूर्वी प्रशासनाने निलंबन आढावा समितीची बैठक घेऊन लाचखोरीतून निलंबित झालेल्या सुमारे दहा जणांना सेवेत घेण्याचा विषय चर्चेला घेतला होता.