कीनन, रिबेन हत्येतील चौघांना आजन्म तुरुंगवास

अवघ्या मुंबईला हादरा देणाऱ्या, अंधेरीतील २० ऑक्टोबर २०११च्या छेडछाड आणि हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी आजन्म तुरुंगवास ठोठावला. आपल्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्या या चौघा नराधमांना रोखणाऱ्या कीनन सँतोस (२४) आणि रिबेन फर्नाडिस (२९) यांना भर रस्त्यात आणि शेकडो लोकांसमक्ष प्राणास मुकावे लागले होते. मुंबईच्या बहुतांश न्यायप्रिय समाजजीवनाला तडे देणाऱ्या या घटनेचे तीव्र पडसाद जनमानसात उमटले. मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नालाही या घटनेने वाचा फुटली होती.

जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या चार नराधमांची नावे असून न्यायालयाने त्यांना कीनन व रुबेन यांच्या हत्येसह विनयभंगाच्या आरोपातही दोषी ठरवले आहे. खटल्यात एकूण ३५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र ज्या दोन मैत्रिणींच्या छेडछाड काढण्यात आली. त्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली.

कीनन आणि रिबेन हे दोघे २० ऑक्टोबर २०११ रोजी मित्रमैत्रिणींसोबत ‘आंबोली’ हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टीनंतर घरी परतत असताना हॉटेलबाहेरच त्यांच्या मैत्रिणींची चौघांनी छेडछाड काढण्यास सुरुवात केली. कीनन आणि रूबेन यांनी आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगीही उडाली. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना स्थानिक तेथे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. नंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र काही वेळातच आपल्या अन्य साथीदारांसह हत्यारे घेऊन ते परतले आणि त्यांनी कीनन आणि रिबेन या दोघांवर भीषण हल्ला चढवत त्यांना चाकूने भोसकले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. हा सगळा प्रकार घडत असताना एकाही स्थानिकाने त्यात हस्तक्षेप करून या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेल्यानंतर त्यांनी कीनन आणि रिबेनला जवळच्या रुग्णालयात नेले होते. मात्र त्याच दिवशी उपचारादरम्यान कीननचा मृत्यू झाला. तर १० दिवसांनी रूबेनचाही मृत्यू झाला.

न्यायाधीशांनी निकाल जाहीर केला तेव्हा कीननचे वडील व्हॅलेरीयन सँतोस यांचा चेहरा अत्यंत शांत होता. नंतर पत्रकारांना ते म्हणाले की, हा सर्वाचाच विजय आहे. कीनन आणि रुबेनचा विजय आहे. कीननचा वाढदिवस मार्चमध्ये होता. तेव्हा मी त्याला या निकालाची भेट देऊ इच्छित होतो, असे भावपूर्ण उद्गारही त्यांनी काढले. निकालाचे स्वागत करतानाच निकालाला लागलेल्या विलंबाबाबत मात्र त्यांनी खंत व्यक्त केली. आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती असे आपले म्हणणे नाही. परंतु न्यायदानाची प्रक्रिया जलद होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.