करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह तासन्तास अंत्यसंस्कारांसाठी ताटकळत ठेवले जाऊ शकत नाहीत. अंत्यसंस्कारासाठी वेळ लागत असल्यास मृतदेह शवागारात ठेवण्यात यावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. त्याच वेळी मुंबईसह राज्यभरातील स्मशानभूमी स्थिती काय आहे, त्यांच्यावर किती ताण आहे, पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी वा तांत्रिक कारणांमुळे बंद असलेल्या विद्युतदाहिन्या सुरू करण्यासाठी प्रयत्न के ले जात आहेत का, याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला दिले.

करोनाशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करणाऱ्या, विशेषत: व्यवस्थापनात ढिसाळपणा असल्याचा आरोप करणाऱ्या स्नेहा मारजादी यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी मुंबईतील बऱ्याच विद्युतदाहिन्या योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याने स्मशानभूमीबाहेर मृतदेहांवर अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईक तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे याचिकाकत्र्यांच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयानेही त्याची दखल घेत बीडमध्ये एका रुग्णवाहिकेतून १२ करोना रुग्णांचे मृतदेह नेल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताकडे लक्ष वेधले. स्मशानभूमीबाहेर करोना रुग्णांचे मृतदेह तासन्तास अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत असल्याबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त करून अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लगणार असल्यास अशा वेळी मृतदेह शवागारातच ठेवण्यात यावेत, असे न्यायालयाने सांगितले. राज्यभरातील स्मशानभूमीच्या स्थितीबाबत तुम्ही पुढील सुनावणीच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश देऊन करोना रुग्णांच्या मृतदेहांवर वेळेत अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी सरकारने संबंधित यंत्रणांना आदेश देण्याची आवश्यकता आहे असे मतही न्यायालयाने नोंदवले.

शवागारातही जागा नाही

मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे. स्मशानभूमीत मृताच्या नातेवाईकाला टोकन दिले जाते. परिणामी स्मशानभूमीबाहेर तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे ही स्थितीही करोनाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे याचिकाकत्र्याचे वकील समिल पुरोहित यांनी सांगितले. शवागरांमध्येही जागा नसल्याची बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

जबाबदारी झटकू नका

संबंधित स्मशानभूमी आणि पालिकेत याबाबत समन्वय साधणे आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र जबाबदारी झटकू नका. सध्या आणीबाणीची स्थिती आहे. अशा वेळी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने सरकारला सुनावले. तांत्रिक कारणास्तव बंद असलेल्या स्मशानभूमी तातडीने सुरू करण्याची सूचनाही न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला दिली आहे.