करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई आणि पुणे बाजार समितीच्या आवारात निर्जतुकीकरण करून, तसेच सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करून बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. त्याच धर्तीवर इतर बाजार समित्यांनी सुद्धा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून राज्यभरातील अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, असा आदेश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिला.

बंदीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी भाजीपाला आणि फळांची टंचाई निर्माण झाल्याने भाववाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्याची दखल घेत पणनमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.

बाजार समितीचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कामकाज सुरू ठेवावे. बाजार समितीच्या आवारात सामाजिक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचाही वापर करावा. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून निघाल्यापासून ते बाजार समितीमध्ये येईपर्यंत आवश्यक ती जबाबदारी घ्यावी, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास होता काम नये, याची सर्व जबाबदारी बाजार समितीने घ्यावी, अशा सक्त सूचना पाटील यांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन संचालक सुनील पवार, मुंबई बाजार समितीचे प्रशासक अनिल चव्हाण, एमसीडीसीचे व्यवस्थापैकीय संचालक मिलिंद आकरे, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख उपस्थित होते.

सोसायटय़ांशी संपर्क साधण्याचे निर्देश

सर्व विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक आणि साहाय्यक निबंधक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ांशी संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट उत्पादक कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न कारावेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर येणार नाहीत आणि गर्दीही होणार नाही. तसेच सहकार आणि पणन विभागांतील सर्व अधिकाऱ्यांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करणे आवश्यक असून कोणीही मुख्यालय सोडू नये, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.