करोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा मंडळाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याऐवजी ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचे ठरविले आहे. मात्र, या निर्णयाबाबत गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. जगन्नाथ यात्रा, पंढरीची वारी असे शेकडो वर्षांची परंपरा असणारे उत्सव साधेपणाने होऊ शकतात तर लालबागचा राजा मंडळानेही असा विचार करायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रि या निर्णयाला विरोध करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे; तर समर्थक मूर्तीचे पावित्र्य, उंचीचे महत्त्व अधोरेखित करत आहेत.

करोना संसर्गाच्या शक्यतेमुळे सार्वजनिक मंडळांनी मूर्तीची उंची चार फुटांपर्यंतच ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी मूर्तीची उंची चार फुटांपर्यंत कमी करण्याचे, साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले. लालबागचा राजा मंडळाचा आग्रह मात्र मूर्तीची उंची कायम ठेवण्याचा होता. ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’, ही मंडळाची भूमिका अत्यंत चूक असल्याची परखड प्रतिक्रिया बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष अण्णा तोंडवळकर यांनी व्यक्त केली.

मंडळाच्या या कृतीतून ८६ वर्षांची परंपरा खंडित होणार आहे. शिवाय हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचाही प्रश्न आहे. ही मूर्ती कोळी बांधवांनी स्थापन केली होती, तेही शाडू मातीची. त्यावेळी असा उंचीचा अट्टाहास कुठेच नव्हता. पण मंडळाचे सध्याचे धोरण पाहता गणेशाची पूजा महत्त्वाची की उंची असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे तोंडवळकर म्हणाले.

माजी महापौर शुभा राऊळ यांनी ‘लालबागचा राजा’ मंडळाचा निर्णय स्तुत्य असल्याचे म्हटले आहे. मुंबईत उंच गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा सुरू आहे. करोनामुळे का होईना ही स्पर्धा खंडीत होईल. उत्सव साजरे करताना पर्यावरणपूरक निर्णय घेतले नाहीत, तर भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

ही मूर्ती साकारणारे संतोष कांबळी म्हणतात, इतर मंडळांप्रमाणे लालबागच्या राजासमोर पूजेसाठीची लहान मूर्ती नसते. १९३४ पासून लालबागचा राजा थेट पूजला जातो आहे. लहानपणापासून आम्ही जे शास्त्र शिकलो, त्यानुसार पूजनाच्या मूर्तीची उंची कमी करता येत नाही. त्यामुळे यावर महिना-दीड महिना चर्चा सुरू होती. १९३५ सालापासून माझे आजोबा लालबागच्या राजाची मूर्ती तयार करत. २००२ सालापासून मी आणि माझे वडील मूर्ती घडवत आहोत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देश-परदेशातून लोक गर्दी करतात. त्यामुळे यंदा गर्दी टाळण्यासाठी मूर्तीची प्रतिष्ठापना न करणेच योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

परिस्थितीनुसार निर्णय योग्य – सोमण

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनीही मंडळाच्या निर्णयाचे स्वागत के ले आहे. काही अडचणींमुळे एखाद्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशस्थापना व पूजा करता आली नाही तरी शास्त्रीय दृष्टीने त्यात चुकीचे काही नाही. परंपरा खंडीत होऊ नये असे गणेशभक्तांना वाटणे साहजिक आहे. पण यावर्षी परिस्थिती अडचणीची आहे हेही समजून घ्यायला पाहिजे. इतर गणेश मंडळांनीही असा निर्णय घेतला तरी तो आजच्या परिस्थितीनुसार योग्य ठरेल.

ऑनलाईन दर्शनाची सुविधा शक्य : बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही ८६ वर्षांची परंपरा अखंडित राहावी, असे आवाहन मंडळाला केले आहे. मंडळाचा आरोग्योत्सव करूनही मूर्तीची स्थापना करता येऊ शकते. पण अर्थात मंडळाने उंचीबाबत सरकारला पाठींबा द्यायला हवा. अद्याप वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नसल्याने मंडळाने गर्दीचे कारण पुढे करणे योग्य नाही. व्यवस्थापन करून लोकांना घरून दर्शन घेण्याचे आवाहन करता येईल. तशी यंत्रणा दरवर्षी मंडळाकडे असते. मूर्तीची प्रतिष्ठाना न करणे म्हणजे भक्तांना देवापासून वेगळे केल्यासारखे आहे, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

शासनाचे निर्देश पाळून उत्सव साजरा करा – शेलार

आरोग्य सेवेचा उपक्रम स्तुत्य आहे. पण, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची सार्वजनिक उत्सवाची परंपरा यंदा एकाएकी खंडित करू नये, असे आवाहन भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी केले आहे. शासनाचे निर्देश पाळून उत्सव साजरा करण्याची ‘हीच ती वेळ’.  ऑनलाइन दर्शनाचा लाभ लाखो भक्त घेऊ शकतील. संकटकाळात श्रद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे भक्त व लालबागच्या राजाची ताटातूट का करावी, असा त्यांनी उपस्थित केला.