करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलासा दिला आहे. इतर आजारांबाबत केईएमचे डॉक्टर्स रुग्णांना सल्ला देणार आहेत. त्यासाठी मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेचे लक्ष्य सध्या करोनाचा निपटारा करण्याकडे केंद्रित झाले आहे. खासगी रुग्णालयांचे बाह्य़रुग्ण विभाग बंद आहेत. शस्त्रक्रि या रद्द करण्यात आल्या आहेत. गंभीर आजार असल्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेण्यात येत नाही. डॉक्टरांनी आपापले दवाखानेही बंद केले आहेत. त्यामुळे सध्या करोनाव्यतिरिक्त काही तक्रार असलेल्या रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रुग्णांना केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी काहीसा दिलासा दिला आहे. करोनाव्यतिरिक्त आरोग्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांसाठी केईएमच्या विभागप्रमुखांनी मदतवाहिनी सुरू केली आहे. आयआयटी बॉम्बे येथील संगणकशास्त्र विभागाच्या डॉ. कामेश्वरी चेब्रो यांनी यासाठीची प्रणाली विकसित केली आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारींवर घरी काही उपाय करता येणे शक्य असते. काही काळजी घेतली तर अनेक आजार बरे होऊ शकतात. केईएमचे डॉक्टर्स रुग्णांच्या तक्रारी ऐकून त्यांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. तातडीने कोणती औषधे घ्यावीत, काय उपाय करावेत, काळजी कशी घ्यावी, प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे का अशा विविध बाबींवर डॉक्टर्स सल्ला देतील.

‘सध्या कोणीही शक्यतो घराबाहेर पडू नये. आरोग्याच्या अनेक तक्रारींवर घरीही काही उपाय करणे शक्य असते. सध्याच्या वातावरणात रुग्णालयातही करोना रुग्णाच्या संपर्कात येण्याचा धोका असताना रुग्णालयांमध्ये गर्दी करण्याऐवजी डॉक्टरांचा आधी सल्ला घ्यावा,’ असे आवाहन केईएमच्या डॉक्टरांनी केले आहे.

मदत कशी मिळेल?

गरजूंनी मदतवाहिनीवर संपर्क साधला की त्याची नोंद प्रणालीमध्ये होईल. यासाठी काम करणारे विद्यार्थी, स्वयंसेवक अडचण योग्य डॉक्टर किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर गरजू व्यक्तीशी संपर्क साधला जाईल. गरजू रुग्ण (०२२-६२३२८२३४) या क्रमांकावर संपर्क साधू शकतील.