पहिल्या टप्प्यात २५० कोटींचे दोन टॉवर

‘केईएम’मध्ये येणाऱ्या रुग्णांची गर्दी पाहाता एक दिवस येथेही चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती येथील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत असून यावर उपाय म्हणून केईएममध्ये पाच बहुमजली टॉवर उभारण्याबरोबरच दोन्ही उपनगरांत ३०० खाटांचे स्पेशालिटी अधिक सामान्य रुग्णालय उभारण्याची योजना पालिका प्रशासनाने तयार केली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न अशी मुंबई महापालिकेची केईएम, शीव, नायर अशी तीन प्रमुख रुग्णालये असून यातील केईएम व शीव रुग्णालयावर रुग्णांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या तसेच मोठय़ा आजारांवर खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च केवळ गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही परवडणारा नसल्यामुळे केईएममध्ये हृदयविकार, मेंदू शस्त्रक्रियांपासून विविध शस्त्रक्रिया व मोठय़ा आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्षांकाठी केईएममध्ये बाह्य़ रुग्ण विभागात सुमारे २० लाख रुग्ण उपचार घेतात, तर जवळपास ८८ हजार शस्त्रक्रिया वर्षांकाठी केल्या जातात. याचाच अर्थ दररोज रुग्ण व नातेवाईक मिळून सकाळच्या वेळी किमान आठ हजार लोक केईएमच्या आवारात उपस्थित असतात. दिवसेंदिवस यात वाढ होत असून सध्याचा बाह्य़रुग्ण विभाग, अपघात विभाग आदी व्यवस्था अपुरी ठरत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

यावर उपाय म्हणून केईएमच्या आवारात २० ते २२ मजल्यांच्या पाच बहुमजली इमारती उभारण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात यातील दोन इमारती उभारण्यात येणार आहेत. या इमारतींचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून यापैकी एका इमारतीमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या इमारतीमध्ये मूलभूत आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता व पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. या दोन इमारतींच्या उभारणीसाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार असून तीन वर्षांत हे बांधकाम पूर्ण केले जाईल. त्यानंतर आगामी पाच वर्षांत उर्वरित तीन टॉवर उभारण्याची योजना असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले. यापैकी एक बहुमजली इमारत ही केईएमच्या आवारात, तर दुसरी अस्थिशल्य विभागाच्या जागेत उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केईएम व शीव रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी पूर्व व पश्चिम उपनगरात ३०० खाटांचे प्रत्येकी पाच सुपरस्पेशालिटी व सामान्य उपचार असणारी रुग्णालये उभारण्याची योजना असून सध्याच्या व्ही. एन. देसाई, एम. टी. अग्रवाल, कूपर, शताब्दी, भगवती आदी रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

शिवसेना व रखवालदार भाजप थंड

  • केईएममध्ये वर्षांकाठी २० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात, तर ८८ हजार शस्त्रक्रिया होत असताना येथे केवळ एकच ‘एमआरआय’ व एकच सीटी स्कॅ न मशीन आहे. त्याचप्रमाणे एक ‘डीएसए’ व एक पेट स्कॅन मशीन असल्यामुळे रुग्णांना बराच काळ ताटकळत बसावे लागते.
  • सामान्यपणे परदेशात अथवा भारतातही ४०० खाटांच्या खासगी रुग्णालयात किमान दोन ‘एमआरआय’ व दोन सीटी स्कॅन मशीन असतात. केईएममध्ये १८०० खाटा आणि रुग्णांचे लोंढे आदळत असताना ‘करून दाखवल्याच्या’ बाता मारणारी शिवसेना आणि रखवालदार भाजपचे नगरसेवक या विषयावर तोंडही उघडताना दिसत नाहीत. गंभीर बाब म्हणजे पालिकेकडे पैसे असूनही प्रशासनातील उच्चपदस्थही या विषयावर गप्पच बसणे पसंत करताना दिसतात.