केईएम रुग्णालयातील ईसीजी यंत्रणेत बिघाड झाल्याप्रकरणी पालिकेने चौकशी समिती नेमली आहे. दरम्यान या घटनेमध्ये होरपळलेल्या चार महिन्यांच्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

केईएमच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर याला हृदयविकारासाठी बुधवारी दाखल केले होते. वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आणलेल्या प्रिन्सला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. हृदयाच्या ठोक्यांवर देखरेख करण्यासाठी ईसीजी यंत्रही त्याला लावले होते. या ईसीजी यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तारांनी पेट घेतला. त्यामुळे प्रिन्सच्या खाटेवरील चादरीलाही आग लागली. यामध्ये त्याच्या खांद्याला, कानाला आणि कमरेच्या भागाला भाजले. आग आटोक्यात आणून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले गेले.

ईसीजी यंत्राने पेट घेतल्याची घटना प्रथमच रुग्णालयात घडली असून याची चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. यासाठी पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्यासह तांत्रिक विभागाचे अभियंता यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.