केईएम रुग्णालयाच्या आवारात भोंदूगिरी करून रुग्णांना लुबाडणाऱ्या मनोहर खंडू साळुंखे ऊर्फ उघडेबाबाचा मठ सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी मठाचा काही भाग तोडला.

केईएम रुग्णालयाच्या आवारातील अस्थिव्यंग विभागाच्या जवळच  मठ सुरू असल्याची तक्रार लालबाग येथील बाळा वेंगुर्लेकर यांनी रुग्णालय प्रशासन आणि साहाय्यक आयुक्तांकडे केली होती. उघडेबाबाची आई केईएम रुग्णालयात कर्मचारी होती. तिला राहण्यासाठी केईएमच्या आवारात जागा देण्यात आली होती. ती निवृत्त झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जागा रिकामी करणे अपेक्षित होते. मात्र मनोहरने या जागेचा बेकायदा ताबा घेतला आणि तेथे मठ सुरू केला. रुग्णांना बरे करण्याचे आश्वासन देऊन मठाचे दलाल त्यांना उघडेबाबाकडे घेऊन येत. त्यासाठी ते प्रत्येक रुग्णाकडून तीन हजार रुपये उकळत असत, अशी तक्रार वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

वेंगुर्लेकर यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून मठाच्या जागेबाबतची माहिती मागविली होती. मठाच्या जागेचा बेकायदा ताबा मिळवून या जागेच्या नावाने आधारकार्ड आणि इतर पुरावेही बाबाने स्वत:च्या नावाने तयार केले.

उघडेबाबा १९८७ पासून रुग्णालयाच्या आवारातच बस्तान बसवून आहे. त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. असा आरोप त्यांनी केला. तसेच त्याच्या विरोधात तक्रार केल्यामुळे मलाही सहा महिन्यांपासून धमकीचे फोन येत आहेत. बाबाच्या दलालांनी या प्रकरणात न पडण्याची धमकी रस्त्यात अडवून दिल्याचा आरोपही वेंगुर्लेकरांनी केला.

पालिकेने शनिवारी मठाचा काही भाग तोडला. उर्वरित भाग पुढील दोन दिवसांत तोडण्यात येणार आहे. या मठाविरोधात वारंवार अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली. रुग्णालयाने केलेल्या तक्रारीनुसार सहा महिन्यांपूर्वीच मठाचा काही भाग अतिक्रमण विभागाने तोडला होता.    – डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

मठ केईएमच्या आवारात असल्याने कारवाई करण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाकडे आहेत. रुग्णालयाचे साहाय्यक अभियंता एस. गुरव आणि विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी एकत्रितपणे शनिवारी कारवाई केली.    – किशोर देसाई, साहाय्यक अधिकारी, एफ-दक्षिण विभाग