News Flash

‘केईएम’मध्ये पहिलेच अवयवदान यशस्वी

राज्यभरात बहुतांश मरणोत्तर अवयवदान हे खासगी रुग्णालयात केले जाते.

‘केईएम’मध्ये पहिलेच अवयवदान यशस्वी
(संग्रहित छायाचित्र)

दोन वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयात अवयवदान प्रक्रिया; ५२ वर्षांच्या व्यक्तीचे यकृत दान

मुंबई: परळ येथील केईएममधील रुग्णालयात प्रथमच यशस्वीपणे अवयवदान करण्यात आले असून ५२ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि मूत्रपिंड मंगळवारी दान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयात अवयवदान झाले आहे. शहरातील हे सातवे अवयवदान आहे

पक्षाघाताचा झटका आलेला ५२ वर्षीय रुग्ण केईएम रुग्णालयात सोमवारी दाखल झाला होता. प्रकृती गंभीर असलेला हा रुग्ण मेंदूमृत झाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी रुग्णाचे यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. यातील यकृत अपोलो रुग्णालयात साताऱ्याच्या रुग्णाला प्रत्यारोपित केले गेले. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने त्याचे मात्र प्रत्यारोपण होऊ शकलेले नाही.

राज्यभरात बहुतांश मरणोत्तर अवयवदान हे खासगी रुग्णालयात केले जाते. याची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे अवयवप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची यादी अजूनही हजारांमध्ये आहे. याउलट सरकारी रुग्णालयात मेंदूमृत रुग्णांची संख्या अधिक असते. तेव्हा सरकारी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन अवयवदान आणि प्रत्यारोपण करावे, याचे प्रयत्न विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून (झेडटीसीसी) केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांत एकाही सार्वजनिक रुग्णालयात अवयवदान किंवा प्रत्यारोपण झालेले नाही, असे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे.

२०१५ मध्ये केईएम रुग्णालयातच मूत्रपिंड प्रत्यारोपण केले गेले होते. त्यानंतर या रुग्णालयात अवयवदान आणि प्रत्यारोपणला प्रोत्साहन देण्यासाठी खास युनिट राज्य अवयवदान समितीकडून(रोटो) केईएममध्ये सुरू झाले आहे.

वर्षभरात रोटो आणि रुग्णालय प्रशासनाची स्वतंत्र टीम कार्यरत आहे. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जातात. शिवाय अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे वारंवार प्रशिक्षण घेतले जाते.

मेंदूमृत रुग्ण, प्रत्यारोपण करण्यायोग्य अवयव या बाबी लक्षात घेऊन योग्य दाता ओळखणे हे या विभागाचे महत्त्वाचे काम असते. त्यानंतर या दात्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्याचे कामही या टीमकडून केले जाते. या प्रयत्नांतूनच रुग्णालयात प्रथमच अवयवदान केल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नव्या वर्षांत पहिल्याच महिन्यात आठ अवयवदान

अवयवदान प्रक्रियेबाबत जनजागृती यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. नव्या वर्षांत पहिल्याच महिन्यात शहरात सात रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदान केले आहे. यातून ९ यकृत, १ फुप्फुस, ४ हृदय, ५ मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 12:56 am

Web Title: kem hospital first donate organs akp 94
Next Stories
1 तिकिटांसाठी ‘बेस्ट’ची  डिजिटल पेमेंट सुविधा
2 ठाणे-पनवेल एसी प्रवास १८५ रुपयांत
3 १३०० सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या, केजरीवालांच्या आरोपाला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर
Just Now!
X