|| शैलजा तिवले

पुरवठादार आणि रुग्णालय प्रशासनातील वादाचा गरजू रुग्णांना त्रास

मुंबई : अस्थिरोगाच्या विविध आजारांमध्ये बसविण्यात येणाऱ्या रोपणाचा (इम्प्लांट) पुरवठा बंद झाल्याने केईएम रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खुबारोपण, गुडघारोपणासारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया जवळपास दोन वर्षांपासून बंद आहेत. पालिकेच्या अन्य रुग्णालयांच्या तुलनेत मोठे रुग्णालय असूनही या योजनेंतर्गत सर्वाधित कमी शस्त्रक्रिया केईएमच्या अस्थिरोग विभागात केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

केईएम अत्याधुनिक रुग्णालय असून अपघात, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसह अनेक उपचारपद्धती उपलब्ध असल्याने मुंबई आणि बाहेरील राज्यांतूनही अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अस्थिसंबंधित आजारांमध्ये विविध प्रकारचे रोपण (इम्प्लांट) बसविले जातात. काही छोटे इप्लांट वगळता इम्प्लांटच्या किमती या एक लाखांहूनही अधिक आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रिया अत्यंत महागडय़ा असतात. आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकातील रुग्णांना महागडे उपचार मोफत मिळावेत या हेतूने जनआरोग्य योजनेंतर्गत रोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाते. परंतु केईएम रुग्णालयात या योजनेंतर्गत शस्त्रक्रियाच होत नसल्याने रुग्णांना  उपचाराविनाच माघारी फिरावे लागत आहे. काही रुग्ण पैसे जमवून उपचार घेत आहेत.

प्रश्न अनुत्तरित..

सात वर्षांत या योजनेंतर्गत केईएमच्या अस्थिरोग विभागात ५ हजार १५८ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. यातील ५ हजार १३५ शस्त्रक्रियाचा परतावा जनआरोग्य हमी सोसायटीने रुग्णालय प्रशासनाच्या खात्यात जमा केला आहे, तर ८ अर्ज विमा कंपनाकडे प्रक्रियेत असून १५ अर्ज रुग्णालयाकडून अजून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने पुरवठादारांचे पैसे का थकीत ठेवले, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

खुबारोपण, गुडघारोपण यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी जवळपास ७० हजार रुपयांची तरतूद जनआरोग्य योजनेमध्ये आहे. चांगल्या दर्जाच्या रोपणाची किंमत एक लाखांहून अधिक आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे अस्थिरोग विभागातील शल्यविशारदांचे म्हणणे आहे. कमी दर्जाचे इम्प्लांट बसविल्यास पुढील जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शस्त्रक्रिया न करण्यामागील अजून एक कारण म्हणजे पुरवठादारांनी केईएममध्ये आवश्यक असलेली रोपण पुरविण्यास नकार दिल्याने ते उपलब्ध नाहीत. पुरवठादारांना काही दिवसांपूर्वीच ५० लाख रुपये प्रशासनाने दिले असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

केईएममध्येच का नाही?  : केईएम रुग्णालयात जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व विभागातील उपचार सुरू असून केवळ अस्थिरोग विभागातील शस्त्रक्रिया होत नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच अधिष्ठात्यांसोबत बैठक घेऊन ही योजना पूर्णपणे राबविण्याबाबत चर्चा केली. एकीकडे शीव येथील लोकमान्य टिळक, नायर या पालिकेच्या रुग्णालयांमध्येही या शस्त्रक्रिया सुरळीतपणे सुरू असताना केईएम रुग्णालयाला करणे का परवडत नाही किंवा का केल्या जात नाहीत, याची पालिका प्रशासनानेही गंभीर दखल घ्यावी, असे महात्मा फुले जनआरोग्य सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.

निविदा काढण्याची मागणी.. : रुग्णालय प्रशासन आणि पुरवठादारांच्या आर्थिक लागेबांधेमुळे इम्प्लांट खरेदीमध्ये अनेक घोटाळे होतात. पुरवठादारांकडून इम्प्लांट खरेदी करताना रुग्णांच्या नावे बिले काढत रुग्णालय आणि पुरवठादारही आपले खिसे भरतात. तेव्हा याला चाप लावण्यासाठी निविदा काढून पद्धतशीरपणे इम्प्लांट खरेदी पालिकेने करावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन कोटींहून अधिक थकबाकी

रुग्णालयाने २ कोटींहून अधिक थकबाकी ठेवलेली आहे. बिले दिल्यानंतर महिनोन्महिने तशीच राहतात. वेळेनुसार बिले काढून खात्यावर पैसे जमा करण्याची रुग्णालयातील यंत्रणा अत्यंत ढिसाळपणे काम करते. पाठपुरावा करण्यासाठी गेल्यावरही योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे आम्ही रोपणपुरवठा खंडित केला आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर रुग्णालयाबाबत मात्र हा अनुभव नसल्याने तेथे इम्प्लांट पुरविण्यास आम्ही कधीच नकार देत नाही, असे पुरवठादारांनी सांगितले.

कारण काय?

पुरवठादारांचे कोटय़वधी रुपये रुग्णालय प्रशासनाने थकीत ठेवल्याने त्यांनी रोपण (इम्प्लांट) पुरविणे बंद केले आहे. त्यामुळे मणक्याशी संबंधित काही शस्त्रक्रिया वगळता रोपणाच्या  कोणत्याही शस्त्रक्रिया सध्या रुग्णालयात केल्या जात नसल्याची बाब समोर आली आहे.