एकीकडे कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला मारहाण झाल्याप्रकरणी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. अशातच मुंबईतल्या KEM रूग्णालयात काम करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओंकार ठाकूर असं या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचं नाव आहे. ओंकार हा केईएम रूग्णालयात फिजिओथेरेपीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तसेच तो दादर येथील कोहिनूर टॉवरच्या ए विंगमध्ये रहात होता. ओंकारने पहाटेच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ओंकारला लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओंकारने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस यासंदर्भातला तपास करत आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचा आणि या आत्महत्येचा काही संबंध आहे का? हेदेखील पोलीस तपासून पाहात आहेत.