केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या दोन महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. ह्रदय बंद पडल्याने प्रिन्सचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री केईएम रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत प्रिन्स राजभर १५ ते २० टक्के भाजला होता. प्रिन्सचा डावा हात पूर्णपणे भाजला असल्याने शस्त्रक्रिया करत काढण्यात आला होता. यानंतर त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण गुरुवारी रात्री त्याची प्रकृती बिघडली होती अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

“रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास प्रिन्सचं ह्रदय बंद पडलं. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. प्रिन्स आणि त्याचे कुटुंब मुळचे वाराणसीचं आहे. वाराणसीच्या शासकीय रुग्णालयात प्रिन्सच्या हृदयविकाराचे निदान झाले. उपचार, शस्त्रक्रियेसाठी तेथील डॉक्टरांनी प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्याचे वडील पन्नेलाल राजभर यांनी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं.

नेमकं काय झालं होतं –
पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या प्रिन्स राजभर या अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाला हात गमवावा लागला होता. ७ नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली. आगीत प्रिन्स राजभर १५ ते २० टक्के भाजला होता. प्रिन्सचा डावा हात पूर्णपणे भाजला असल्याने शस्त्रक्रिया करत काढण्यात आला होता.

भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
अपघात घडल्यानंतर त्याचे परिणाम किंवा गंभीरतेबाबत राजभर दाम्पत्य अनभिज्ञ होते. सोमवारी प्रिन्सचा हात काढल्यानंतर मात्र वडील पन्नेलाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. जबाब नोंदवून पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३३८ नुसार गुन्हा नोंदवला.

दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय
केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभरला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जातील, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार आहेत.