अंधत्व आल्याने अनेकांना आधारासाठी काठीची सोबत करून आयुष्य कंठावे लागत असले तरी, हल्ली समाजातील नेत्रदात्यांमुळे अंधांना पुन्हा नवी दृष्टी मिळताना दिसते. परळच्या केईएम रुग्णालयातदेखील नेत्रदात्यांच्या माध्यमातून अनेक अंधांना नवी दृष्टी देण्यात आली असून रुग्णालयाने या दृष्टी प्राप्त झालेल्यांच्या काठय़ांचा संग्रह करत त्यांना दिवे लावून त्याचे प्रकाशित कारंजे रुग्णालयाच्या आवारात बसवले आहे. नेत्रदानाच्या जागृतीसाठी बसवलेल्या या ‘दीपदर्शी’ कांरजाचे मंगळवारी सायंकाळी अनावरण झाले असून रुग्णालयात आलेल्या ज्या अंधांना दृष्टी मिळाली आहे त्या प्रत्येकाची काठी या कारंजात त्याच्या नावानिशी उभारण्यात आली आहे.
नेत्रदानाच्या माध्यमातून अनेक अंधांना नवे जग पाहण्याची संधी मिळत असल्याने मरणोत्तर नेत्रदानाचा पर्याय बहुतांश सुजाण नागरिकांनी निवडल्याचे पाहण्यात येते. मात्र, याबाबत अनेक गैरसमजुती पसरल्याने व जागृती नसल्याने नेत्रदात्यांची संख्या ही कमीच असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर मात करण्यासाठी समाजात नेत्रदानाची चळवळ अनेक सामाजिक संस्था व रुग्णालये राबवताना दिसतात. आता या चळवळीत मुंबईतील सुप्रसिद्ध केईएम रुग्णालयानेदेखील सहभाग घेतला असून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यास रुग्णालयाने सुरुवात केली आहे. यासाठी परळ येथील आय बँक रिसर्च कोऑर्डिनेशन सेंटर व केईएम रुग्णालयाचा नेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयाच्या अपघात कक्षासमोरील मोकळ्या जागेत एक अनोखे कारंजे उभारण्यात आले आहे. रुग्णालयात नेत्रदात्यांच्या डोळ्यांचा वापर करून ज्या ज्या अंधांना दृष्टी मिळवून देण्यात आली आहे, अशांच्या काठय़ा एकत्र करून त्यांना छोटे दिवे लावण्यात आले आहेत. या दिवे लावलेल्या काठय़ांचेच हे कारंजे निर्माण करण्यात आले आहे. तसेच, ज्यांच्या या काठय़ा आहेत त्यांची नावेदेखील या काठय़ांवर कोरण्यात आली आहेत. जवळपास ९० काठय़ांचे हे कारंजे असून रुग्णालयात येणाऱ्यांचे ते लक्ष आकृष्ट करून घेत आहे. मंगळवारी सायंकाळी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते या कारंजाचे उद्घाटन करण्यात आल्याचे विभागाच्या प्रमुख डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.

नेत्रदान ही सध्याच्या काळाची गरज असून या विषयाबद्दल जनमानसात जागृती व्हावी व मरणोत्तर लोकांच्या उपयोगात येण्याचे कार्य प्रत्येकाच्या हातून व्हावे यासाठी हे कांरजे उभारले आहे. नेत्रदानाची जागृती करण्यासाठी असे कारंजे निर्माण करण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे.
– डॉ. सरोज सहदेव, नेत्र विभाग प्रमुख, के.ई.एम. रुग्णालय