मुंबई : ‘केंट आरओ’ची गृहोपयोगी उपकरणे करोना विषाणूंचे र्निजतुकीकरण करतात, असा जाहिरातीतून केलेला दावा या कंपनीला मागे घ्यावा लागला आहे. याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने गंभीर आक्षेप घेतल्यानंतर ही जाहिरात ३० ऑक्टोबरपासून आपण मागे घेत असल्याचे कंपनीने ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया’ला कळवले आहे.

या जाहिरातीविरुद्ध मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी डॉ. अर्चना सबनीस यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. यावर जाहिरातीतील दावा सिद्ध करून दाखवण्याची नोटीस संबंधित कंपनीवर बजावण्यात आली. मात्र, कंपनीने हा दावा सिद्ध करण्याऐवजी ३० ऑक्टोबरपासून या जाहिरातीत अशा प्रकारचा दावा करणार नाही, असे कळवले आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीने याच जाहिरातीविरुद्ध नव्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा’कडेही तक्रार केली आहे.

या फसव्या जाहिरातीत ‘केंट आरओ’ने हेमा मालिनी यांचा वापर केला असल्याने सदर कंपनी आणि हेमा मालिनी या दोघांनाही ग्राहक संरक्षण कायदा कलम १८ अन्वये प्रत्येकी दहा लाख रुपये दंड करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षा म्हणून याच कायद्यानुसार पुढील एक वर्ष हेमा मालिनी यांना कोणत्याही वस्तू/सेवेची जाहिरात करण्यास बंदी करावी, अशी मागणीही मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे केली आहे.