पालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यालगतचा केरळीय समाजाला भाडेतत्त्वाने दिलेला भूखंडहा भूखंड उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केरळीय समाजाचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला महापालिका सभागृहाने बुधवारी हिरवा कंदील दाखविला.   महापौर बंगला आणि केरळीय समाजाचा भूखंड अशा एकूण ११,९१३.०१ चौ. मीटरवर स्मारक उभारण्यात येणार आहे.

राज्य सरकारने महापौर बंगल्याच्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून ही ११,५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या ताब्यात देण्यात आली आहे. महापौर बंगल्यालगतची ३६२ चौरस मीटर जागा केरळीय समाज संस्थेला भाडेतत्त्वाने देण्यात आली होती. ही जागाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविरोधात केरळीय समाज संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाबाहेर तडजोड करून संस्थेला अन्यत्र जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे हा वाद संपुष्टात आला.

केरळीय समाजाची जागा ताब्यात घेऊन ती स्मारकासाठी देण्याचा प्रस्ताव बुधवारी पालिका सभागृहात सादर केला होता. या प्रस्तावास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे आता ११,९१३.०१ चौरस मीटर भूखंडावर  स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.