01 December 2020

News Flash

तुम्ही ‘ईडी’ लावली, तर मी ‘सीडी’ लावेन!

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसे यांचा भाजपला इशारा

(संग्रहित छायाचित्र)

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा सूड म्हणून त्यांनी माझी ‘ईडी’ (सक्तवसुली संचालनालय) मार्फत चौकशी लावली, तर मी त्यांची ‘सीडी’ लावेन. मग जे व्हायचे ते उघड होईल, असा इशारा राष्ट्रवादीत प्रवेश करताना भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी दिला. भाजप सरकारच्या काळातील भूखंड गैरव्यवहारही उघड करण्याचे त्यांनी जाहीर केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत खडसे यांनी गुरुवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी बॅलार्ड पियर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. कार्यालयात मोजक्या कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था केली होती, मात्र कार्यालयाबाहेर खडसे समर्थकांनी गर्दी केली होती. त्यांच्यासाठी बाहेर पडद्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपच्या राज्यातील नेत्यांवर हल्ला चढवला. मी द्वेषाचे राजकारण केले नाही. पाठीत खंजीर खुपसला नाही, पण मी लेचापेचा नाही. त्यांनी माझी ‘ईडी’मार्फत चौकशी लावली तर मी त्यांची ‘सीडी’ लावेन, मग जे काय उघड व्हायचे ते होईल, असे आव्हान खडसे यांनी भाजपला दिले.

मी ४० वर्षे भाजपमध्ये काम केले. परंतु माझी मानहानी करण्यात आली. माझा गुन्हा काय हे वारंवार विचारले, परंतु या क्षणापर्यंत मला उत्तर मिळाले नाही. माझ्याविरोधात भूखंडाच्या चौकशा लावल्या. आता थोडे दिवस जाऊ दे, कुणी किती भूखंड घेतले हे दाखवतो, असा इशारा खडसे यांनी भाजप नेतृत्वाला दिला.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची इच्छ होती आणि दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही मला तसाच सल्ला दिल्याचे खडसे म्हणाले. ज्या निष्ठेने भाजपमध्ये काम केले त्याच निष्ठेने यापुढे राष्ट्रवादीचे काम करत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल पवार म्हणाले की, इतिहासाचा पहिला टप्पा संपला आहे, आता दुसरा टप्पा सुरू होतोय. नाथाभाऊ पक्षात आल्यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्य़ात पक्षवाढीला गती मिळणार आहे. अनेक नेत्यांनी आपले आयुष्य या जिल्ह्य़ासाठी दिले आहे. एका निष्ठेने काम करणारा हा जिल्हा आहे. तेथे नवी पिढी उदयाला आली, ती उभी करण्याचे काम खडसे यांनी केले. आता नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्य़ातील नवे-जुने कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची ताकद वाढेल.

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत आमच्या बैठका झाल्या. परंतु एका शब्दानेही त्यांनी कसली अपेक्षा व्यक्त केली नाही. कोणतीही अपेक्षा न करता पक्षाचे काम करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. मात्र वृत्त वाहिन्यांवर, कुणा मंत्र्याला घरी पाठविणार वगैरे अशा काही बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही, काहीही बदल होणार नाही, सगळे जेथे आहेत, तेथेच राहतील, असे पवार यांनी सांगितले.

पक्षप्रवेश कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदी नेते उपस्थित होते. करोनामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करताना अंतर नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेण्यात आली होती.

ही तर सुरुवात ..

जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत करताना भाजपला चिमटे काढले. सिनेमातील विविध उदाहरणे देत त्यांनी कोपरखळ्या लगावल्या. विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना ‘कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा’ हा प्रश्न केला होता. परंतु त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. मात्र त्यांना आता कळेल ‘टायगर अभी जिंदा है. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही तर के वळ सुरुवात आहे आणि अजून बरेच रांगेत आहेत,’ असे सूचित करताना जयंत पाटील यांनी ‘पिक्चर अभी बाकी है’ अशी टिप्पणी केली.

अजित पवार नाराज नाहीत

या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित नाहीत, त्यामुळे ते नाराज आहेत, अशा बातम्याही वृत्त वाहिन्यावर झळकल्या. परंतु करोनाच्या संकटकाळात काळजी घ्यावी, असे मी सर्वाना सांगितले आहे, त्यामुळे ते कार्यक्रमाला आले नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळात बदल नाही – पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात जे जेथे आहेत, तेथेच राहतील, असे स्पष्ट करीत, खडसे यांना मंत्रिपद देण्यासाठी, राष्ट्रवादीच्या कुणा एकाला मंत्रिपदाचा त्याग करावा लागेल, या चर्चेला पवार यांनी पूर्णविराम दिला. खडसे यांच्यामुळे खान्देशात पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:26 am

Web Title: khadse warns bjp after joining ncp abn 97
Next Stories
1 व्यायामशाळा उद्यापासून खुल्या
2 अतिवृष्टीग्रस्तांना १० हजार कोटी
3 फुलबाजारात दसऱ्याची लगबग
Just Now!
X