सागरी युद्धातील महत्त्वाचा दुवा ठरणार; नौदलाच्या क्षमतेत दुपटीने वाढ; जहाजभेदी क्षेपणास्त्राने सज्ज

नौदलाच्या क्षमतेत दुपटीने वाढ करणाऱ्या तसेच सागरी युद्धातील महत्त्वाचा दुवा ठरू शकणाऱ्या स्कॉर्पिन वर्गातील दुसऱ्या ‘खांदेरी’ या पाणबुडीचे जलावतरण गुरुवारी मुंबईतील माझगाव गोदी येथे झाले. टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी या वर्षअखेरीस भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा आदी उपस्थित होते. भामरे यांच्या पत्नी बीना भामरे यांच्या हस्ते हा जलावतरण सोहळा पार पडला. खांदेरी या जलदुर्गावरून या पाणबुडीचे नाव खांदेरी ठेवण्यात आल्याचे या वेळी माझगाव गोदीतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीसोबत स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुडय़ांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. प्रकल्प ७५ अंतर्गत या पाणबुडय़ांची बांधणी सुरू असून यापूर्वी ‘कलवरी’ या पाणबुडीचे जलावतरण पार पडले होते. मात्र, स्कॉर्पिन पाणबुडीच्या प्रकल्पा संदर्भातील काही गोपनीय माहिती मध्यंतरी उघड झाल्याने या प्रकल्पाबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, याचा पाणबुडी निर्मितीशी काही संबंध नसल्याचे त्या वेळी नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले होते. त्या पाश्र्वभूमीवर या पाणबुडीचा जलावतरण सोहळा मुंबईत पार पडला. तसेच, या सोहळ्याला पाकिस्ताननेही नुकतेच केलेल्या स्वतच्या पाणबुडीच्या जलावतरण घोषणेचीही किनार होती.

या वेळी उपस्थित असलेले संरक्षण राज्यमंत्री भामरे म्हणाले की, भारतीय बनावटीची पाणबुडी निर्माण करण्यात आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. लवकरच या वर्गातील अन्य सक्षम पाणबुम्डय़ा नौदलात दाखल होतील. या वेळी त्यांनी स्कॉर्पिन पाणबुडी प्रकल्पाबाबत फुटलेल्या गोपनीय माहितीचा आणि कलवरी पाणबुडीच्या जलावतरणाला झालेला उशीर याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

माझगाव गोदी येथे नुकताच आयएनएस बेतवा ही युद्धनौका उलटून अपघात झाला होता. याबाबत भामरे यांना विचारले असता हा काही फार मोठा अपघात नसून असे किरकोळ अपघात होत असतात असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया या वेळी उंचावल्या होत्या.

संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी

संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या या पाणबुडीत अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि उत्तम संपर्क यंत्रणा असून आधुनिक युद्धात आवश्यक असलेले सगळे मानदंड या पाणबुडीने पूर्ण केल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले. जमिनीवर मारा करणे, प्रतिस्पर्धी पाणबुडीशी लढा देणे, गोपनीय माहिती जमवणे आदी बाबींसाठी विशेषत ही पाणबुडी ओळखली जाते. यापूर्वी ‘फॉक्सटॉर्ट’ वर्गात खांदेरी नावाची पाणबुडी होती. ती १९८९ मध्ये सेवेतून मुक्त झाली होती. त्यानंतर आता ही दुसरी खांदेरी पाणबुडी नौदलात समाविष्ट होणार आहे.

जवान चंदू चव्हाण लवकरच भारतात परतणार

नकळत सीमारेषा ओलांडल्याने पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारतीय जवान तथा धुळे तालुक्यातील बोरविहिरचे रहिवासी चंदू चव्हाण लवकरच भारतात परतण्याची आशा वाढली आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी जवान चव्हाण यांच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली आहे. पाकिस्तानला या संदर्भातील आवश्यक सर्व कागदपत्रे सोपविण्यात आली असून सर्व ते सोपस्कार सरकारकडून पूर्ण करण्यात आल्यावर चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यात येईल, असे भामरे यांनी म्हटले आहे.

जहाज बांधणी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या तज्ज्ञांनी अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आणि ज्ञानानंतर या पाणबुडीची निर्मिती केली आहे. आपल्या शत्रूवर नेमका हल्ला करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम पाणबुडीशी या खांदेरी पाणबुडीची तुलना होऊ शकते.  -लांबा, नौदलप्रमुख