पोलिसानेच एखाद्या चोरासारखी धूम ठोकल्याचे कधी पाहिलंय?..मुंबईतल्या कार्टर रोडवर असाच अजब प्रकार घडला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या(एसीबी) पथकाने आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचल्याची चाहूल लागताच खार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी नोटांचे बंडल घेऊन चक्क आपल्या पहिल्या मजल्यावरील घरातून उडी मारून पलायन केले.
खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र नर्लेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सामंत यांच्याविरोधात मागील महिन्यात लाच घेतल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल करण्यात आली होती.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सामंत यांनी फोन करून दिली होती. तेव्हा, हे प्रकरण मिटवायचे असल्यास ५ लाख रुपये देण्याची मागणी पोलीस निरीक्षक महेंद्र नर्लेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी केली. परंतु, कुणालाही लाच द्यायची इच्छा नसल्याने थेट एसीबीचे कार्यालय गाठत आपली तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतल्याचे तक्रारदारने आपल्या तक्रारीत म्हटले.
आलेल्या तक्रारीनुसार एसीबीने दोन्ही पोलीस अधिकाऱयांचे फोन टॅप केले आणि यात पोलीस निरीक्षक सुभाष सामंत ५० लाखांची लाच मागत असल्याचे समोर आले. अखेर तडजोड करत १० लाखांवर सौदा पक्का देखील करण्यात आला होता.
मग, या दोन अधिकाऱयांना रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने सापळा रचला. सामंत यांनी तक्रारदाराला कार्टर रोडवरील आपल्या घरी २० हजार रुपयांचा हप्ता घेऊन बोलावले होते. मात्र, आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचल्याची कुणकुण लागताच सामंत नोटांचे बंडल घेऊन पसार झाले. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून शोध सुरू आहे.