मुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार म्हणजे हिमालयाने हिमालयाला दिलेला पुरस्कार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खय्याम आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या दोघांच्या संगीत क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचा गौरव केला.

ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खय्याम यांना ‘हृदयनाथ मंगेशकर‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘हृदयेश आर्टस्’च्या २९व्या वर्धापनदिनानिमित्त दिनानाथ नाटय़गृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही उपस्थित होते. मंगेशकर कुटुंब ही अलौकिक देणगी आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचा आलेख नेहमी चढता राहिलेला आहे. सर्व प्रकारच्या गीतांमध्ये त्यांनी योगदान दिलेले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी हृदयनाथ मंगेशकर यांच्याविषयी काढले. त्यामुळेच खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार म्हणजे हिमालयाने हिमालयाला दिलेला पुरस्कार असल्याचे म्हटले. खय्यामजी हे ९२ वर्षांचे वृद्ध नसून ९२ वर्षांचे तरुण आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी खय्याम यांचा गौरव केला.  पुरस्कार स्वीकारल्यानंतर खय्याम यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संगीत क्षेत्रातील मंगेशकर कुटुंबियांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले.