नेमबाजी हा खेळ घराघरांत पोहोचविणाऱ्या आणि ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या, ‘महाराष्ट्राची सुवर्णकन्या’ अंजली भागवत यांच्या कारकीर्दीचा दूरचित्रसंवादात्मक वेध येत्या शुक्रवारी, २४ जुलैला सायंकाळी ५ वाजता लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमातून घेतला जाणार आहे.

विख्यात प्रशिक्षक संजय चक्र वर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, अनुजा जंग आणि लिना शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या पंचकन्यांनी नेमबाजीच्या क्षितिजावर महाराष्ट्राचे नाव अधोरेखित केले. नेमबाजी हा क्रीडा प्रकार त्या काळात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. परंतु कीर्ती महाविद्यालयात असताना राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) रुजू झाल्याने दादरच्या मध्यमवर्गीय घरातील अंजली यांची नेमबाजीशी पहिल्यांदा गाठ पडली. मग त्यांनी जागतिक स्तरावर अनेक पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राची सुवर्णकन्या ही ओळख निर्माण केली.

नव्वदच्या दशकात भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांकडे क्रीडाप्रेमींचा ओढा कमी होता. मात्र त्या काळात अंजली यांनी नेमबाजीसारख्या कठीण खेळात सोनेरी यश मिळवून दाखवले.

बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण, बिलियर्ड्सपटू गीत सेठी, बुद्धिबळात विश्वनाथन आनंद यांच्याप्रमाणेच क्रि के टेतर खेळात कौटुंबिक पाठबळ आणि स्वयंस्फू र्तीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यानंतर अंजली यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक युवक-युवती या खेळात कारकीर्द करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

‘खेलरत्न’ हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने २००३मध्ये अंजली यांचा गौरव करण्यात आला होता. त्याआधी २०००मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर १९९२मध्ये राज्यातील शिवछत्रपती पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला होता.

आंतरराष्ट्रीय नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर एक प्रशिक्षक म्हणून अंजली या विशेष प्रभाव पाडत आहे. पुण्यात स्थायिक झालेल्या अंजली यांनी त्यांच्या घरामध्येच १० मीटर रेंज तयार केली आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’सह अनेक नियतकालिकांमध्ये नियमित विश्लेषणात्मक लेखन, क्रीडाविषयक चर्चासंवादांमध्ये सहभाग हीदेखील त्यांची स्वतंत्र ओळख आहे.

सहभागासाठी : https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_24July येथे नोंदणी आवश्यक.