सामान्य मुंबईकरांचा दररोजचा प्रवास सुखकर करणारे दोन मार्ग सोमवारी खुले होणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभ्या राहणाऱ्या खेरवाडी जंक्शन उड्डाणपुलाची मुंबईकडे येणारी मार्गिका आणि पूर्व मुक्तमार्गाचा उर्वरित पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता या दोन मार्गाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन होईल.
पश्चिम द्रुतगती मार्गावर खेरवाडी जंक्शनजवळ सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील उड्डाणपूल सुरू झाल्यावर मुंबईकरांना कमालीचा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर दहिसर ते वरळी या टप्प्यात वाहनांना एकही सिग्नल लागणार नाही. गेल्या वर्षी पूर्व मुक्तमार्ग चेंबूपर्यंत खुला करण्यात आला होता. मात्र आता २.८० किलोमीटर लांबीच्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचे (पीजीएलआर) काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे दक्षिण मुंबईपासून घाटकोपपर्यंतचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल.
* खेरवाडी जंक्शनजवळील उड्डाणपुलाची एक मार्गिका खुली होणार
* या मार्गिकेची लांबी ५८० मीटर एवढी आहे.
* दहिसर ते वरळी या टप्प्यात वाहनांना एकही सिग्नल लागणार नाही.
* पूर्व मुक्तमार्गावरील २.८० किलोमीटर लांबीच्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्या (पीजीएलआर) खुला होणार
* दक्षिण मुंबईपासून घाटकोपपर्यंतचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य.