दोन चिमुकल्यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका झाल्याच्या सुखद घटना ताज्या असतानाच शुक्रवारी एका अपहृत मुलीला प्राण गमवावे लागले. बोरिवलीमधील दौलतनगर येथून एक वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पळणाऱ्या अपहरणकर्त्यांचा बोरिवली-कांदिवलीदरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला. चिमुकलीलाही आपला जीव गमवावा लागला. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह आढळला.
रेखा चौहान ही विधवा महिला बोरिवली (पूर्व) येथील दौलतनगर झोपडपट्टीत आपल्या तीन मुलांसह राहते. काही महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याने ती बोरिवली स्थानकात फळ विक्रीचा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत होती. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास तिने संध्या या एक वर्षांच्या मुलीला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर नेले. रेखा पाणी आणण्यासाठी आत गेली असता अज्ञात इसमाने संध्याला पळवले. एका पंचविशीतील तरुणाने संध्याला उचलून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. त्यामुळे रात्रीच त्यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सकाळी झुडपात सापडला मृतदेह
संध्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी पोईसर नाल्याजवळील रेल्वे रुळालगतच्या झुडपात संध्याचा मृतदेह आढळला. याच ठिकाणी रेल्वे रुळावर शुक्रवारी रात्री एका तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. रात्री १०.१० च्या सुमारास हा अपघात झाला होता. संध्याचे अपहरण करून पळालेला तरुण हाच असल्याचे कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत वरळीकर यांनी सांगितले.
संध्याला पळवून नेत असताना रेल्वेची त्याला धडक लागली आणि त्या धडकेमुळे त्याच्या हातातून संध्या निसटून झुडपात पडली असावी, असे त्यांनी सांगितले. या अपहरणकर्त्यां तरुणाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
संध्याचा काय दोष?
बुधवारी संध्याकाळी याच दौलतनगर झोपडपट्टीतून बाहुली जगदाळे या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते, पण पोलिसांच्या विशेष शाखेने दुसऱ्याच दिवशी अपहरणकर्त्यां जोडप्याला अटक करून बाहुलीची सुखरूप सुटका केली होती. तर गुरुवारी हाजी अली येथून तीन महिन्यांच्या बाळाच्या अपहरणकर्त्यां महिलेलाही गावदेवी पोलिसांनी अटक करून बाळाला आईकडे सोपवले होते, पण संध्या मात्र दुर्दैवी ठरली. देवाने अपहरणकर्त्यांला शिक्षा दिली, पण माझ्या संध्याचा काय दोष होता, असा आर्त सवाल तिची आई रेखाने केला.