उबर टॅक्सीचा गुन्ह्य़ासाठी वापर
पाच लाखांच्या खंडणीसाठी एका चार वर्षे वयाच्या बालकाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक करून गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली युनिटने या बालकाची सुखरूप सुटका केली. या गुन्ह्य़ात वापरलेली इंडिका गाडी उबर कंपनीची टॅक्सी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मालाड पश्चिम मालवणीतील महाकाली नगरमधून चार वर्षे वयाच्या मुलाचे अज्ञात इसमांनी २७ ऑक्टोबर रोजी अपहरण केले. इंडिका गाडीतून त्यांनी मुलाला नेल्याची चौकशीत स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास मुलाची हत्या करण्याची धमकी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी दूरध्वनीवरून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कांदिवली गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी निरीक्षक चिमाजी आढाव, सोनावणी, नितीन विचारे आदींनी समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सुरुवातीला संजय चव्हाण व राजेश चव्हाण या दोघा संशयितांना कांदिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून विरार पश्चिम येथील चंदनसार येथे छापा टाकून मुलाची सुखरूप सुटका केली. त्या वेळी संतोष विश्वकर्मा आणि दीपा गुप्ता या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्य़ात त्यांना अटक करण्यात आल्याचे सहायक आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले. याशिवाय सिमकार्ड व बनावट कागदपत्रे बनवून दिल्याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली.
स्वत:ला पत्रकार म्हणविणारा विश्वकर्मा हा या कटाचा सूत्रधार असून त्यानेच इतरांच्या मदतीने पैशासाठी अपहरण केले. त्याच्याविरुद्ध एमएचबी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.