हाजी अली येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या मुलीची गावदेवी पोलिसांनी अवघ्या १४ तासांत शोध लावून नाटय़मयरित्या सुटका केली. हाती कोणताही दुवा नसताना अवघ्या सात सेकंदाच्या अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अपहरणकर्त्यां महिलेस लखनौला पळून जात असताना अटक केली. विविध कारणांनी टीका झेलणाऱ्या पोलिसांसाठी हे तपासनाटय़ एक सुखद झुळुकच ठरले आहे.
हाजी अली येथील सिग्नलजवळील सबवे समोर मनिषा सानप उर्फ आफ्रिन झैद (२३) ही महिला किरकोळ वस्तूंची विक्री करते. तिने आपले तीन महिन्यांचे बाळ सबवे मध्ये एका झोळीत झोपवले होते. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास कुणीतरी ते बाळ पळवले. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनिषाने शोधाशोध केली आणि गावदेवी पोलीस ठाणे गाठले. दुपारी दोन वाजता गावदेवी पोलिसांनी बाळाला शोधण्यासाठी पोलिसांची सात पथके बनवली. पोलिसांनी परिसरातील एकूण तीन सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यापैकी हिरापन्ना शॉपिग सेंटरच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अवघ्या सात सेकंदाची चित्रफित मिळाली. त्यात एक महिला बाळाला घेऊन जात असताना दिसली. पोलिसांकडे केवळ हाच दुवा होता.
टॅक्सीवाला मदतीला आला
बाळ चोरून ही महिला टॅक्सीने गेली असेल, असा अंदाज पोलिसांनी बांधला आणि परिसरातल्या सर्व टॅक्सीचालकांची चौकशी सुरू केली. त्यापैकी उमाकांत पटेल (२६) या टॅक्सीचालकाने बाळ घेऊन एक महिला आपल्या टॅक्सीत बसल्याचे सांगितले.
या महिलेला त्याने भायखळा स्थानकात सोडले होते. पोलिसांनी भायखळा स्थानकातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण काही निष्पन्न झाले नाही. पण ही महिला लखनौला जाणार असल्याचा उल्लेख तिच्या बोलण्यात आला होता, असे त्याने सांगितले. त्या माहितीच्या आधारे ही महिला लखनौला जाणार असे, गृहीत धरून आम्ही कुर्ला, दादर, वांद्रे, सीएसटी टर्मिनसवर ‘फिल्डिंग’ लावली, अशी माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर यांनी
दिली.
लखनौला पळून जात असताना अटक
 शुक्रवारी पहाटे ४ वाजता पोलीस उपनिरीक्षक सुनिल माने यांना एक महिला बाळाला घेऊन लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढत असताना दिसली. त्यांनी त्वरीत त्या महिलेस हटकले आणि चौकशी करून पोलीस ठाण्यात आणले. सुरुवातीला आपलेच बाळ असल्याचे सांगणाऱ्या या महिलेने अखेरीस बाळ पळविल्याची कबुली दिली. शबनम अब्बास शेख (४०) असे या महिलेचे नाव असून ती भिवंडीत राहते. पोलिसांना जर काही मिनिटांचा उशीर झाला असता तर हे बाळ कदाचित कधीस सापडले नसते.पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप लोणंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गमरे, सह पोलीस निरीक्षक मनोज हेगिष्टे, सह पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, अनिल जाधव तसेच पोलीस कर्मचारी सावंत, कांबळे, पवार, सोंडे, मिरगल, चौगुले आदींच्या पथकाने १२ तासांच्या प्रयत्नांती बाळाची सुखरूप सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या पथकाला लोणंदकर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
लखनौला नेण्याची योजना
बाळाला घेऊन जाणारी महिला लखनौला जाण्यासंबंधी बोलल्याचे टॅक्सीवाल्याकडून कळल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या स्थानकांवर  बंदोबस्त केला. परंतु तरीही पोलिसांना गुंगारा देऊन ती महिला लखनौला पळून जाऊ शकेल, ही शक्यता गृहित धरून पोलिसांनी लखनौला जाण्याचीही तयारी केली होती. एक पथक तातडीने विमानाने लखनौला पाठविण्याचे ठरले होते. तसेच लखनौमध्येही पोलिसांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. सह पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही माहिती दिली.
सुदैवी ‘बाहुली’
बोरिवलीहून अपहरण करण्यात आलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीची सुटका पोलिसांच्या विशेष कक्ष १ च्या पथकाने केली. बुधवारी दुपारी या मुलीचे तिच्या घराजवळून एका जोडप्याने अपहरण केले होते. बोरिवलीच्या दौलत नगर झोपडपट्टीत बाहुली जगदाळे ही तीन वर्षांची मुलगी राहते.गुरुवारी संध्याकाळी बोरिवली रेल्वे स्थानकात जोडप्याकडे लहान मुलगी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जतन माळकर (३५) आणि डिकुली माळकर (३०) असे या जोडप्याचे नाव असून ते मूळ पश्चिम बंगालमधील आहेत.  भिक मागण्यासाठी पश्चिम बंगालला नेण्याची योजना होती, असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पवार यांनी सांगितले. विशेष कक्षाचे पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बागल यांनी ही कामगिरी केली.