उधारीचे घेतलेले पैसे परत न देता टोलवाटोलवी करणाऱ्या कर्जदाराच्या भावाचेच पैशांसाठी अपहरण केल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडल्याचे प्रकाशझोतात आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चौकडीपैकी त्रिकुटाला अटक केली असून तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

तहुवरअली दुल्हासन शाह, शिव विमल शर्मा,आणि धनेश अनुप टिब्रेवाला अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून सुरेंद्र राजपूत या फरारी आरोपीचा शोध वाकोला पोलीस घेत आहेत. या अपहरणाबाबत अधिक माहिती अशी की,  नानाजी कासमी वाण हे सांताक्रूझ वाकोला परिसरात राहतात. त्यांचा काचेचा व्यापार असून त्यांच्या दुकानात अरविंद वाण हा कामाला होता. काही दिवसापूर्वी अरविंदचा भाऊ प्रकाश वाण याने  आरोपी तहुवरअली गुलहसन  शाह यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. तहुवरअली याला पैशाची गरज असल्याने त्याने प्रकाश वाण  यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. मात्र प्रकाश  टाळाटाळ करीत होता. वारंवारच्या तारखेवर तारीख देणाऱ्या प्रकाशला धडा शिकवण्यासाठी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने १४ जानेवारीला कर्जदार प्रकाश वाण याचा भाऊ अरविंद याचे अपहरण चारजणांनी केले. त्याच परिसरात अरविंद याला कोंडून ठेवण्यात आल्याची माहिती नानाजी यांना मिळताच त्यांनी वाकोला पोलिसांना माहिती दिली. नानाजी यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची शोधमोहीम सुरु करण्यात आली. पोलिसांनी अरविंद याची नेहरू नगर परिसरातून सुटका करीत तिघांना अटक केली. मात्र, चौथा आरोपी सुरेंद्र राजपूत याने पळ काढला. तिघांना वांद्रे न्यायालयात नेले असता त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.